बागेश्वर धामच्या धीरेंद्र शास्त्रींवर हिंदू एकता यात्रेत मोबाईल फेकून मारण्यात आला. हा मोबाईल धीरेंद्र शास्त्रींच्या गालावर लागला. यावर शास्त्रींनी कोणीतरी मोबाईल फेकून मला मारले आहे, आता मला माझा मोबाईल मिळाला आहे, असे म्हटले आहे.
धीरेंद्र शास्त्रींनी हिंदू एकता रॅली काढली आहे. भक्तांसोबत पायी चालत असताना ते समर्थकांना संबोधित करत होते. यावेळी त्यांच्यावर भक्तांकडून फुलांचा वर्षाव करण्यात येत होता. याचवेळी कोणीतरी त्यांच्यावर मोबाईल फेकून मारला. तो धीरेंद्र शास्त्रींच्या तोंडावर बसला. कोणी फेकला ते गर्दीत काही समजू शकलेले नाही. परंतू, फुलांसोबत चुकून फेकला गेला असेल, असेही तिथे सांगितले जात होते.
हिंदू एकता रॅलीचा आज सहावा दिवस आहे. बागेश्वर धामहून ही यात्रा निघाली आहे. हजारोंच्या संख्येने लोक या यात्रेत आले आहेत. रस्त्यावर फुले टाकून यात्रेचे स्वागत केले जात आहे. ही यात्रा २१ नोव्हेंबरला सुरु झाली आहे. या यात्रेत ग्रेट खली, संजय दत्त देखील सहभागी झाला होता. याचबरोबर अनेक राजकीय नेत्यांनीही यास उपस्थिती लावली आहे. यामध्ये काँग्रेसचे आमदार जयवर्धनव सिंह यांचाही समावेश आहे.
यात्रा सुरु करताना धीरेंद्र शास्त्रींनी जातीच्या पाशातून आपण सर्वांनी बाहेर पडायचे आहे, असे म्हटले होते. सनातन धर्म मजबूत असावा, आपसात एकता असावी, भेदभाव नसावा, असे त्यांनी म्हटले होते.