संजय शर्मा, लोकमत न्यूज नेटवर्क, नवी दिल्ली: उत्तर प्रदेशात लोकसभेच्या सर्व ८० जागा जिंकण्यासाठी केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांनी यूपी भाजपच्या नेत्यांची बैठक बोलावली आहे. मागासवर्गाला जोडण्यासाठी या बैठकीत विशेष रणनीती तयार केली जाणार आहे. केंद्रातील सत्ता कायम राखण्यासाठी उत्तर प्रदेशातील ८० जागा महत्त्वाची भूमिका बजावतात. यामुळे २०२४च्या सार्वत्रिक निवडणुकीसाठी भाजपने यूपीसाठी मिशन ८० तयार केले आहे. म्हणजेच राज्यातील सर्व ८० जागा जिंकण्याचा पक्षाचा प्रयत्न आहे.
लोकसभेची प्रत्येक जागा जिंकण्यासाठी भाजपने वेगवेगळी रणनीती तयार केली आहे. यासाठी सोशल इंजिनीअरिंग, जातीनिहाय समीकरणही तयार केले आहे.
ओबीसीमधील गैरयादव मतदारांवर लक्ष
- लोकसभा निवडणुकीत मागासवर्गाला जोडण्यासाठी रणनीती.
- समाजवादी पार्टीची व्होट बँक यादव व मुस्लिमांवर केंद्रित आहे.
- भाजपने ओबीसीमधील गैरयादव मतदारांवर लक्ष केंद्रित केले आहे.
- ओमप्रकाश राजभर यांनाही बरोबर घेण्यात आले आहे. आता त्यांना योगी आदित्यनाथ सरकारमध्ये मंत्री केले जाणार आहे.
- मागासवर्गातील नेते दारासिंह यांनाही भाजपने अलीकडेच निवडणुकीच्या मैदानात उतरवले होते.
- भाजपच्या सूत्रांनी म्हटले आहे की, प्रत्येक लोकसभा जागा जिंकण्यासाठी विशेष रणनीती तयार करण्यात आली आहे.
- सप व बसपच्या बालेकिल्ल्याला सुरुंग लावण्यासाठी तसेच काँग्रेसकडून रायबरेलीची जागा घेण्यासाठी जातीनिहाय समीकरणावर लक्ष दिले जात आहे.
- पराभूत झालेल्या जागा जिंकण्यासाठी दोन वर्षांपासून तयारी.