हरयाणातील पराभवानंतर उत्तर प्रदेशात सपाचा काँग्रेसला धक्का, केली मोठी घोषणा!
By ऑनलाइन लोकमत | Published: October 9, 2024 06:05 PM2024-10-09T18:05:25+5:302024-10-09T18:06:50+5:30
हरयाणा विधानसभा निवडणुकीत झालेल्या काँग्रेसच्या पराभवाने उत्तर प्रदेशातील राजकीय समीकरण बदलताना दिसत आहे. समाजवादी पक्षाने (एसपी) काँग्रेससोबत कुठलीही चर्चा ...
हरयाणा विधानसभा निवडणुकीत झालेल्या काँग्रेसच्या पराभवाने उत्तर प्रदेशातील राजकीय समीकरण बदलताना दिसत आहे. समाजवादी पक्षाने (एसपी) काँग्रेससोबत कुठलीही चर्चा न करता पोटनिवडणुकीसाठी आपल्या 6 उमेदवारांची नावे जाहीर केली आहेत. करहल विधानसभा मतदारसंघाव्यतिरिक्त सपाने सिसिमाऊ, फुलपूर, मिल्कीपूर, कटहारी आणि माझंवा येथून उमेदवार घोषित केले आहेत. हरियाणा निवडणुकीच्या निकालानंतर उत्तर प्रदेशात सपाने जागावाटपासंदर्भात आक्रमक दिसत असलेल्या काँग्रेसला झटका देण्यास सुरुवात केली असून आघाडीसंदर्भात कसलीही चर्चा न करताच उमेदवारही जाहीर केले आहे.
कोणत्या जागेवर कुणाला दिली उमेदवारी? -
पोटनिवडणुकीसाठी समाजवादी पक्षाने 6 नावांची घोषणा केली आहे. करहल विधानसभा मतदारसंघातून पक्षाने तेज प्रताप यादव यांना उमेदवारी दिली आहे. महत्वाचे म्हणजे, लोकसभा निवडणुकीवेळीही तेज प्रताप यादव यांना कन्नौज मतदारसंघातून उमेदवारी देण्यात आली होती, मात्र सपा कार्यकर्त्यांच्या विरोधानंतर अखिलेश यादव यांनी स्वत: कन्नौज मतदारसंघातून निवडणूक लढवली होती. यामुळे करहल विधानसभेची जागा रिकामी झाली होती. याशिवाय सपाने सिसीमऊ येथून नसीम सोलंकी, फुलपूरमधून मुस्तफा सिद्दीकी, मिल्कीपूरमधून अजित प्रसाद, काटेहरीमधून शोभवी वर्मा आणि मझवांमधून ज्योती बिंद यांना उमेदवारी जाहीर केली आहे.
या जागांवर होणार पोटनिवडणूक -
1. खैर, अलीगड
2. मिल्कीपूर, अयोध्या
3. कटेहरी, अंबेडकरनगर
4. मीरापूर, मुझफ्फरनगर
5. सीसामऊ, कानपूर
6. फूलपूर, प्रयागराज
7. गाझियाबाद
8. मझवां, मिर्झापूर
9. कुंदरकी, मुरादाबाद
10. करहल, मैनपुरी
— Samajwadi Party (@samajwadiparty) October 9, 2024
अखिलेश-राहुल मैत्री तुटण्याच्या मार्गावर? -
लोकसभा निवडणुकीत एकत्रितपणे लढलेल्या समाजवादी आणि काँग्रेसमध्ये पोटनिवडणुकीसंदर्भात कोणतीही सहमती होताना दिसत नाही. माध्यमांतील वृत्तांनुसार, बदललेल्या समीकरणामुळे सपा आता काँग्रेसला केवळ एकच जागा देण्याचा विचार करत आहे. आघाडीसंदर्भात समाजवादी पक्ष आता फ्रंटफूटवर असून काँग्रेसला केवळ फुलपूर जागेचाच प्रस्ताव देऊ शकते. यानंतर, उत्तर प्रदेशातील अखिलेश यादव आणि राहुल गांधी यांची मैत्री तुटण्याच्या मार्गावर तर पोहोचली नाही ना? अशी चर्चा सुरू झाली आहे.