बरेली: उत्तर प्रदेशातील बरेलीमधून तरुणाच्या आत्महत्येची घटना समोर आली आहे. सोमवारी एका विवाहित तरुणाने पत्नीच्या सततच्या भांडणाला कंटाळून घरात गळफास घेतला. पोलिसांनी त्याचा मृतदेह शवविच्छेदनासाठी पाठवला आहे. पोलिसांना एक सुसाईड नोटही सापडली आहे. त्यात त्या तरुणाने आत्महत्येस पत्नीला जबाबदार धरण्यास सांगितले आहे. तसेच, माझ्या मृतदेहाला वडील आणि मित्रांशिवाय कोणीही हात लावू नये, असेही म्हटले आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, बरेलीतील संजय नगरमध्ये राहणारा विनय रिक्षा चालवून उदरनिर्वाह करायचा. रविवारी(दि.25) रात्री त्याने पत्नीच्या ओढणीने गळफास लावून आत्महत्या केली. सोमवारी सकाळी त्याचा मृतदेह लटकलेल्या अवस्थेत आढळला. पोलिसांना त्याच्या खोलीत एक सुसाईड नोटही सापडली. त्याने पत्नीला स्वत:च्या मृत्यूसाठी जबाबदार धरले आहे.
विनयने दहा वर्षांपूर्वी त्याच्या घराशेजारीच राहणाऱ्या तरुणीशी प्रेम विवाह केला होता. त्यांना आठ वर्षांचा एक मुलगाही आहे. लग्नानंतर पत्नी विनयकडे घटस्फोट मागू लागली. यावरुन त्यांच्यात सतत भांडण व्हायचे, म्हणूनच विनय तणावाखाली होता. काही दिवसांपूर्वीही दोघांमध्ये वाद झाला, त्यानंतर विनयच्या पत्नीने पोलीस तक्रार दाखल केली. रविवारी विनय माहेरी गेलेल्या पत्नीला घरी आणण्यासाठी गेला, त्यावेळी मेहुण्याने त्याला शिवीगाळ करुन हाकलून दिले.
यानंतर नंतर त्याने रविवारी घरात कोणी नसताना पत्नीच्या ओढणीने गळफास घेऊन आत्महत्या केली. त्याने चिठ्ठी लिहून पत्नीला जबाबदार धरले. तसेच, मृतदेहाला वडील आणि मित्रांशिवाय कोणीही हात लावायचा नाही, असेही म्हटले. माझ्या जिन्समध्ये पैसे ठेवले आहेत, त्या पैशातून माझ्यावर अंत्यसंस्कार करण्यात यावा, असेही विनयने त्याच्या शेवटच्या चिठ्ठीत लिहिले. सध्या पोलीस या प्रकरणाचा अधिक तपास करत आहेत.