Muzaffarnagar: उत्तर प्रदेशातील मुझफ्फरनगर जिल्ह्यातून एक विचित्र घटना समोर आली आहे. काही दिवसांपूर्वी सोशल मीडियावर एक व्हिडिओ व्हायरल झाला होता, ज्यात एक तरुण भररस्त्यात एका तरुणीचा विनयभंग आणि मारहाण करताना दिसत होता. ही बाब निदर्शनास येताच पोलिसांनी मुलीच्या कुटुंबियांच्या तक्रारीवरुन गुन्हा दाखल करुन आरोपीला ताब्यात घेतले. आता या प्रकरणात नवा ट्विस्ट आला आहे.
सविस्तर माहिती अशी की, मुझफ्फरनगरच्या जनसाठ शहरात पाच दिवसांपूर्वी आर्य समाज मंदिराजवळ महाविद्यालयात जाणाऱ्या तरुणीचे चुंबन, विनयभंग आणि चापट मारल्याची घटना उघडकीस आली होती. या संपूर्ण प्रकरणाचा व्हिडिओही व्हायरल झाला होता. व्हिडिओ पाहून मुलीच्या कुटुंबियांनी पोलिस ठाण्यात तक्रार दिली. व्हिडिओच्या आधारे कारवाई करत पोलिसांनी आरोपी तरुणालाही तडकाफडकी ताब्यात घेतले होते.
यानंतर पोलिसांनी मुलीला तिचा जबाब नोंदवण्यासाठी पोलिस ठाण्यात बोलावले. परंतु, मुलीने आरोपीविरुद्ध कोणतीही कारवाई करण्यास स्पष्ट नकार दिल्याने प्रकरणाला कलाटणी मिळाली. मुलीने अचानक शब्द फिरवल्यामुळे पोलिसांनी आरोपीला तंबी देऊन सोडून दिले. तरुण आणि तरुणी एकाच समाजातील असल्याचा दावा केला जात आहे.
आता या प्रकरणात नवा ट्विस्ट आला आहे. मंगळवारी रात्री आरोपी तरुण आणि पीडित तरुणीचे लग्न झाले आहे. त्यांच्या लग्नाचे काही फोटोही सोशल मीडियावर व्हायरल होत आहेत. कुटुंबियांच्या संमतीने दोघांनी मंदिरात सात फेरे घेऊन लगीनगाठ बांधली. हे प्रकरण सध्या परिसरात चर्चेचा विषय ठरत आहे.