उत्तर प्रदेश पोलीस कॉन्स्टेबल भरतीमधील पेपर लीक प्रकरणामुळे तरुण निराश आणि संतप्त आहेत. कॉपी करणारे लोक आणि त्याच्याशी संबंधित लोकांच्या घरावर बुलडोझर चालवावा, अशी तरुणांची मागणी आहे. गुरुवारी, शेकडो उमेदवार हातात छोटा बुलडोझर घेऊन लखीमपूर खेरी जिल्ह्यातील जिल्हा मुख्यालयातील डीएम कार्यालयाबाहेर पोहोचले.
पोलीस भरती परीक्षेला बसलेले उमेदवार "एक ही नारा एक ही नाम री एग्जाम... री एग्जाम..." अशी घोषणा देत आहेत. या पोलीस भरती परीक्षेला बसलेल्या एका तरुणाने सांगितलं की, आम्ही खूप मेहनत केली आणि आता पेपर लीक झाल्याचं समोर येत आहे. पुढील भरतीसाठी आमचं वयही वाढणार आहे, त्यामुळे पेपरफुटीमागे असणाऱ्यांवर कडक कारवाई करावी.
घरावर बुलडोझर चालवण्याची मागणी
डीएम कार्यालयाबाहेर पोहोचलेल्या पोलीस भरती परीक्षेच्या उमेदवाराने सांगितलं की, आम्ही डीएम कार्यालयाबाहेर घोषणा देत आहोत. अमन सिंग म्हणाला की, आम्ही 17-18 रोजी यूपी पोलीस भरती परीक्षा दिली होती, परीक्षेच्या दोन-चार तास आधीच त्याची उत्तर आली होती. त्यामुळे आम्ही पुन्हा परीक्षेची मागणी करत आहोत. एका तरुणाने सांगितले की, सीएम योगी यांना 'बुलडोझर बाबा' म्हणूनही ओळखलं जातं, त्यामुळे पेपर लीकची चौकशी व्हावी आणि जे दोषी असतील, त्यांच्या घरांवर बुलडोझर फिरवावा, अशी आमची इच्छा आहे.
यूपी पोलीस कॉन्स्टेबलच्या एकूण 60,244 रिक्त जागा भरण्यासाठी 17 आणि 18 फेब्रुवारी रोजी 48 लाखांहून अधिक जणांचा पेपर दोन शिफ्टमध्ये घेण्यात आला होता. उमेदवारांनी दावा केला आहे की, 17 फेब्रुवारीला दुसऱ्या शिफ्टचा पेपर सोशल मीडियावर व्हायरल झाला होता. यूपी पोलीस भर्ती बोर्डाने पेपर लीकचे वृत्त खोटे ठरवले असले तरी नंतर चौकशीचे आदेश दिले आहेत.