उत्तर प्रदेशातील फारुखाबाद जिल्ह्यातील यूपी पोलिसांच्या एका कॉन्स्टेबलचं रजेचं पत्र सोशल मीडियावर जोरदार व्हायरल होत आहे. कॉन्स्टेबल राघव चतुर्वेदी यांनी पत्रात रजा घेण्याचे कारण नमूद केलं असून त्याचं लग्नाचं वय निघून जात असल्याचं म्हटलं आहे. मोठ्या कष्टाने चांगलं स्थळ आलं आहे. मुलीला भेटायला जायचं आहे, कृपया पाच दिवसांची रजा द्या असं म्हटलं आहे.
कॉन्स्टेबलच्या या पत्रावर सीओ सिटी यांनी त्याची रजा मंजूर केली आहे. हे संपूर्ण प्रकरण फारुखाबादच्या कादरी गेट पोलीस ठाण्यात तैनात कॉन्स्टेबल राघव चतुर्वेदी यांच्याशी संबंधित आहे. आपल्या अर्जात कॉन्स्टेबलने लिहिलं आहे की, तो पोलीस दलात तीन वर्षांपासून कार्यरत आहे.
आता लग्नाचं वयही जवळ येत आहे. आजकाल पोलिसांसाठी स्थळ येत नाहीत. वडिलांनी फोन करून सांगितलं की त्यांना एक चांगलं स्थळ सापडलं आहे. मुलगी पाहण्यासाठी पाच दिवसांचा अवधी द्यावा. रजेचा असा अर्ज वाचून अधिकाऱ्यांनी 5 दिवसांची रजा मंजूर केली.
दरम्यान, हे पत्र आता सोशल मीडियावरही तुफान व्हायरल होत आहे. या विचित्र पत्रावर लोकांकडून मोठ्या प्रमाणात प्रतिक्रिया येत आहेत. सध्या सीओ सिटी यांनी कॉन्स्टेबलच्या 15 दिवसांच्या सीएलला मान्यता दिली आहे. मात्र रजेचा अर्ज आणि त्याचे कारण हा लोकांमध्ये चर्चेचा विषय राहिला आहे. एका हिंदी वेबसाईटने याबाबतचे वृत्त दिले आहे.