उत्तर प्रदेशातील बरेली जिल्ह्यातून धक्कादायक घटना समोर आली आहे. एक रोडवेज बस चक्क चालकाविना धावायला लागली. बस सुरू होताच प्रवाशांमध्ये एकच गोंधळ उडाला. काही अंतर गेल्यावर बस एका रेस्टॉरंटमध्ये घुसली. सुदैवाने या घटनेत प्रवाशांना दुखापत झाली नाही. घटनेवेळी बसमध्ये सुमारे 30 प्रवासी होते. शॉर्टसर्किटमुळे बस सुरू झाल्याचे चालकाने सांगितले. मिळालेल्या माहितीनुसार, बरेलीत खुप जुन्या रोडवेज बस धावतात. मुरादाबाद, बदाऊन, आग्रा आणि मथुरा येथून या बसेस बरेलीत येतात. आज सकाळी UP 25 AT 1621 क्रमांकाची बस मुरादाबादकडे निघाली. चालकाने बस जुन्या बसस्थानकावर थांबवून काही कामानिमित्त कार्यालयात गेला. यावेळी बस अचानक सुरू झाली.
शॉर्टसर्किटमुळे बस सुरू झाली आणि चालकाशिवाय पुढे जाऊ लागली. चालकाविना बस चालत असल्याचे पाहून प्रवासी घाबरले आणि आरडाओरडा करू लागले. काहींनी घाबरून खिडकीतून उड्या मारल्या. बस तिथे उभी असलेल्या बसला धडकून नंतर एका हॉटेलमध्ये शिरली. या घटनेत सुदैवाने कुठलीही जीवितहानी झाली नाही. यानंतर ती बस दुरुस्त करुन पुढे नेण्यात आली. या घटनेची सध्या परिसरात चर्चा सुरू आहे.