उत्तर प्रदेशमधील मेरठ येथून एक धक्कादायक प्रकार समोर आला आहे. येथे एक मुस्लिम तरुण नाव बदलून पुजारी बनून मंदिरात राहत होता. मात्र तेथील लोकांना संशय आल्यानंतर त्यांनी त्याची तक्रार पोलिसांकडे केली. पोलिसांनी कसून चौकशी करताच त्याचं बिंग फुटलं आणि त्याने आपली खरी ओळख सांगितली. गुल्लू खान हा गुल्लू नाम धारण करून मंदिरात पुजारी बनून राहत होता, अशी बाबत समोर आली. त्यानंतर त्याला अटक करण्यात आली. आता तपास यंत्रणा याबाबत अधिक तपास करत आहेत.
हा धक्कादायक प्रकार मेरठमधील दौराला पोलीस ठाण्याच्या हद्दीतील मटौर येथे घडला आहे. गुल्लू हा तेथील शिव मंदिरात गेल्या ७ महिन्यांपासून पूजा करत होता. लोकांनीही तो पुजारी असल्याची समजूत करून घेतली. मात्र काही गावकऱ्यांना त्याचं वर्तन पाहून संशय आला. त्यानंतर त्यांनी पोलिसांकडे तक्रार दिली. त्यानंतर पोलिसांनी अधिक पडताळणी केली. तेव्हा धक्कादायक प्रकार समोर आला. आरोपी गुल्लू खान याला पोलिसांनी धार्मिक भावना दुखावल्याच्या आरोपाखाली अटक करण्यात आली आहे.
दरम्यान, एलआययू आणि अन्य तपास यंत्रणा या प्रकरणाची सखोलपणे चौकशी करत आहेत. आरोपीचा गुन्हेगारी इतिहास आणि गुन्ह्यांबाबत पडताळणी केली जात आहे. एसपी पीयूष सिंह यांनी सांगितले की, ग्रामस्थांनी पुजाऱ्याच्या संशयास्पद हालचालींबाबत तक्रार केली आहे. त्या पुजाऱ्याला ताब्यात घेऊन चौकशी केली असता त्याने आपलं नाव गुल्लू इस्माइल असल्याचे कबूल केले. याआधी आपण सोनिपत येथे राहिल्याचे तसेच तिथून मेरठ येथे आल्याचेही त्याने कबूल केले. आता त्याच्याबाबत अधिक माहिती घेतली जात आहे.