लोकसभा निवडणुकीत उत्तर प्रदेशमध्ये लागलेल्या धक्कादायक निकालांनंतर आता देशभरातील राजकीय वर्तुळाचं लक्ष उत्तर प्रदेशात विधानसभेच्या १० जागांवर होणाऱ्या पोटनिवडणुकीकडे लागलं आहे. या पोटनिवडणुकीकडे इंडिया आघाडीसाठी भाजपाला धक्का देण्यासाठीची आणखी एक संधी तर भाजपासाठी आव्हान म्हणून पाहिलं जात आहे. दरम्यान, या पोटनिवडणुकीपूर्वी भाजपाची डोकेदुखी वाढवणारी आणखी एक बातमी समोर आली आहे. उत्तर प्रदेशमधील विधानसभेच्या १० जागांसाठी होणाऱ्या पोटनिवडणुकीमध्ये समाजवादी पक्षासोबत आघाडी करून लढण्याचा निर्णय काँग्रेसने घेतला आहेत. त्यामुळे या निवडणुकीत इंडिया आघाडीची ताकद दिसण्याची शक्यता आहे.
उत्तर प्रदेशमधील विधानसभेच्या १० जागांसाठी होत असलेल्या पोटनिवडणुकीच्या पार्श्वभूमीवर काँग्रेसने २१ जुलै रोजी लखनौ येथे सर्व जिल्हाध्यक्षांची बैठक बोलावली आहे. या बैठकीमध्ये सर्व गोष्टींना अंतिम रूप दिलं जाईल. उत्त प्रदेशमधील पोटनिवडणुकीत समादवादी पक्ष ७ तर काँग्रेस ३ जागांवर लढण्याची शक्यता आहे. उत्तर प्रदेशमधील करहल, मिल्किपूर, कटेहरी, कुंदरकी, गाझियाबाद, खैर, मीरापूर, फूलपूर, मंझवा आणि सिसामऊ या विधानसभा मतदारसंघांमध्ये पोटनिवडणूक होणार आहे. यामधील ५ जागा समाजवादी पक्षाकडे तर ३ जागा भाजपाकडे आहेत. त्या व्यतिरिक्त आरएलडी आणि निषाद पार्टीकडे प्रत्येकी १ जागा आहे. लोकसभा निवडणुकीत समाजवादी पक्षाने भाजपाला दिलेला धक्का विचाारात घेता ही निवडणूक भाजपा आणि मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांच्यासाठी आव्हानात्मक मानली जात आहे.
एवढंच नाही तर उत्तर प्रदेशमधील या १० जागांवर होत असलेली पोटनिवडणूक ही राज्य आणि देशाच्या राजकारणाला दिशा देणारी ठरू शकते. त्याचं कारण म्हणजे उत्तर प्रदेशमध्ये मिळालेल्या बंपर यशामुळेच भाजपाला २०१४ आणि २०१९ मध्ये केंद्रात स्पष्ट बहुमतासह सरकार स्थापन करता आलं होतं. मात्र २०२४ च्या निवडणुकीत भाजपाला उत्तर प्रदेशात अनपेक्षित अपयश आल्याने केंद्रातही पक्षाचं बहुमत हुकलं. तसेच भाजपाच्या जागांमध्येही लक्षणीय अशी घट झाली. त्यामुळे भाजपाच्या कार्यकर्त्यांमध्ये नैराश्य आलं आहे. अशा परिस्थितीत पोटनिवडणुकीत चांगली कामगिरी करून कार्यकर्त्यांचा आत्मविश्वास वाढवण्याचं आव्हान भाजपा नेत्यांसमोर आहे. मात्र पोटनिवडणुकीत ज्या जागांवर मतदान होणार आहे तेथील समिकरणं ही भाजपासाठी आव्हानात्मक आहेत.