नुकत्याच झालेल्या लोकसभा निवडणुकीत भाजपाला जोरदार धक्का बसला होता. तर अखिलेश यादव यांच्या समाजवादी पक्षाला अनपेक्षित आणि घवघवीत यश मिळालं होतं. या निवडणुकीत अखिलेश यादव यांचा पीडीए फॉर्म्युला यशस्वी ठरला होता. दरम्यान, लोकसभा निवडणुकीनंतर आता विधानसभेच्या पोटनिवडणुकीमध्येही पीडीए रणनीतीसह उतरण्याची तयारी अखिलेश यादव आणि समाजवादी पक्षाने केली आहे.
उत्तर प्रदेश विधानसभेच्या रिक्त झालेल्या करहल, मिल्कीपूर, कटेहरी, कुंदरकी, गाझियाबाद, खैर, मीरापूर, फूलपूर, मझवा आणि सीतामऊ विधानसभा मतदारसंघात पोटनिवडणूक होणार आहे. पोटनिवडणूक होत असलेल्या मतदारसंघांपैकी करहल, मिल्कीपूर, कटेहरी, कुंदरकी, सीतामऊ या मतदारसंघांत सपाचे आमदार होते. तर गाझियाबाद, खैर, फूलपूर येथे भाजपाचे आमदार होते. मझवा येथे निषाद पार्टी आणि मीरापूर येथे आरएलडीचे आमदार होते.
मिळत असलेल्या माहितीनुसार या पोटनिवडणुकीसाठी अवधेश प्रसाद यांच्या मुलाला मिल्कीपूर येथून समाजवादी पक्ष उमेदवारी देण्याची शक्यता आहे. तर लालजी वर्मा यांच्या कन्येलाही उमेदवादी देण्याची तयारी सुरू आहे. कटेहरी येथून लालजी वर्मा यांच्या कन्या छाया वर्मा यांना उमेदवारी दिली जाऊ शकते. अमरनाथ मौर्या यांना फूलपूर येथून उमेदवारी देण्यात येऊ शकते. तर अखिलेश यादव यांचा मतदारसंघ असलेल्या करहल येथून तेजप्रताप यादव यांना उमेदवारी दिली जाऊ शकते.
दरम्यान, नुकत्यात झालेल्या लोकसभा निवडणुकीत अखिलेश यादव यांच्या पीडीए अर्थात पिछडा, दलित, अल्पसंख्याक फॉर्म्युला यशस्वी ठरला होता. तसेच समाजवादी पक्षाला ३७ आणि सपाचा मित्रपक्ष असलेल्या काँग्रेसला ६ जागा मिळाल्या होत्या. तर भाजपाला केवळ ३३ जागांवर समाधान मानावं लागलं होतं. त्यामुळे समाजवादी पक्ष उत्तर प्रदेशमधील सर्वात मोठा पक्ष ठरला होता. एवढंच नाही तर आतापर्यंत समाजवादी पक्षाविरोधात मतदान करणारा दलित मतदारही समाजवादी पक्षाकडे मोठ्या प्रमाणात वळला होता.