उत्तर प्रदेशातील बरेली येथे बागेश्वर धामचे पंडित धीरेंद्र कृष्ण शास्त्री यांना जीवे मारण्याची धमकी देण्यात आहे. फेसबुकच्या माध्यमाने ही धमकी देण्यात आली असून यात 'सिर तन से जुदा' करण्यासंदर्भात भाष्य करण्यात आले आहे. यानंतर, हिंदुत्ववादी संघटनांचे कार्यकर्ते भडकले आहेत. त्यांनी बरेलीतील आंवला पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली आहे.
"सनातन धर्माचे गुरू पंडित धीरेंद्र कृष्ण शास्त्री यांचा फोटो लावून आक्षेपार्ह पद्धतीने एडिट करून सोशल मीडियावर व्हायरल करण्यात आला आहे. यासोबत 'सिर तन से जुदा' चा ऑडिओ देखील लावण्यात आला आहे. या व्हिडिओमुळे हिंदूंच्या भावना दुखावल्या गेल्या असून समाजात आक्रोशाचे वातावरण आहे," असे या तक्रारीत म्हणण्यात आले आहे. यावेळी, हिंदुत्ववादी संघटनांचे शेकडो कार्यकर्ते आंवला पोलीस ठाण्याच्या परिसर एकत्रित आले होते. त्यांनी एफआयआर नोंदवण्यासंदर्भात आणि आरोपीवर कारवाई करण्यासंदर्भात मागणी केली.
यानंतर, धमकी दिल्याप्रकरणी पोलिसांनी फैज रझा नावाच्या एका व्यक्तीविरुद्ध कलम 505 (2) अन्वये गुन्हा दाखल केला आहे. या प्रकरणाचा तपास सुरू असून आवश्यक ती कायदेशीर कारवाई केली जात आहे. तसेच घटनास्थळी शांतता आहे, असे पोलिसांनी म्हटले आहे.
महत्वाचे म्हणजे, यापूर्वीही धीरेंद्र कृष्ण शास्त्री यांना धमक्या मिळाल्या आहेत. त्यांच्यासोबत सुरक्षा कर्मचारी तैनात करण्यात आले असून पोलीस त्यांच्या सुरक्षेबाबत सतर्क आहेत.