उत्तर प्रदेशातील हाथरस जिल्ह्यातील फुलरई गावात मगळवारी भोले बाबा यांच्या सतसंगाच्या कार्यक्रमादरम्यान झालेल्या चेंगराचेंगरीत जवळपास 121 जणांचा मृत्यू झाला आहे. तर अनेकांना जखमी अवस्थेत रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. आता या दुर्घटनेसंदर्भात खुद्द भोले बाबा अर्थात नारायण साकार हरी यांची पहिली प्रतिक्रिया समोर आली आहे. भोले बाबा यांनी निवेदन जारी करत, घटनेसंदर्भात दुःख व्यक्त केले आहे. तसेच समाजकंटकांनी ही चेंगराचेंगरी घडवल्याचा दावा करत, त्यांच्यावर कायदेशीर कारवाई केली जाईल, असे म्हटले आहे.
नारायण साकार हरी अर्थात भोले बाबा यांनी आपल्या वकिलामार्फत निवेदन जारी करत म्हटले आहे की, आम्ही मृतांच्या कुटुंबीयांप्रति तीव्र संवेदना व्यक्त करतो आणि परमेश्वराकडे जखमी लोक लवकरात लवकर बरे व्हावेत, यासाठी प्रार्थना करतो. चेंगराचेंगरीसाठी जबाबदार असलेल्या समाजकंटकांवर कायदेशीर कारवाई करण्यासाठी सरर्वोच्च न्यायालयाचे वरिष्ठ वकील डॉ एपी सिंह यांना नेमन्यात आले आहे. तसेच, आपण 2 जुलैला हाथरसमधील फुलरई येथे आयोजित करण्यात आलेल्या सत्संगाच्या कार्यक्रमातून खूप आधीच निघून गेलो होतो, असेही भोले बाबा यांनी म्हटले आहे.
FIR दाखल -हाथरस येथे सत्संगाच्या वेळी झालेल्या दुर्घटनेचा पोलिसांकडून तपास सुरू झाला आहे. वरिष्ठांच्या आदेशानंतर पोलीस या प्रकरणाचा वेगाने तपास करत असल्याचे सांगितले जात आहे. या प्रकरणी पोलिसांनी भोले बाबाचे मुख्य सेवक म्हणून ओळखले जाणारे देवप्रकाश मधुकर याच्या विरोधात भारतीय न्याय संहिता (बीएनएस), २०२३ च्या कलम १०५, ११०, १२६ (२), २२३ आणि २३८ अंतर्गत एफआयआर नोंदवला आहे. मात्र धक्कादायक बाब म्हणजे पोलिसांनी दाखल केलेल्या एफआयआरमध्ये भोले बाबाचे नावच नाही. पोलिसांच्या कारवाईत भोले बाबाचे नाव नसल्याने अनेकांनी आश्चर्य व्यक्त केले आहे.
हाथरसच्या सिकंदरराव पोलीस ठाण्यात रात्री १०:१८ मिनिटांनी एफआयआर नोंदवण्यात आला. ब्रजेश पांडे नावाच्या व्यक्तीने एफआयआर दाखल केला आहे. मुख्य सेवेदार देवप्रकाश याच्या विरोधात हा एफआयआर दाखल करण्यात आला आहे. दुसरीकडे, भोले बाबा यांचे नावच एफआयआरमध्ये नसल्याने या घटनेत मृत्युमुखी पडलेल्यांच्या कुटुंबीयांनी नाराजी व्यक्त केली आहे. लोक सेवेदारांच्या मागे जात नाहीत, भोले बाबामुळे लोक तिथे आले. भोले बाबांना मुख्य आरोपी मानले पाहिजे," असे मृतांच्या कुटुंबियांचे म्हणणे आहे.
...मात्र कार्यक्रमाच्या दिवशी अडीच लाखांहून अधिक भाविक आले -दरम्यान, या कार्यक्रमाची प्रशासनाकडून परवानगी घेण्यात आली होती. मात्र आयोजकांकडून केवळ ८० हजार लोक येणार असल्याचे सांगण्यात आले होते. त्यानुसार प्रशासनाने कार्यक्रमस्थळी चोख बंदोबस्त ठेवला होता. मात्र कार्यक्रमाच्या दिवशी अडीच लाखांहून अधिक भाविक सत्संगसाठी आले. आयोजकांनी भाविकांची संख्या पोलिसांपासून लपवून ठेवली. मात्र सकाळपासूनच कार्यक्रमाचे सुरु असताना अडीच लाख लोकांची गर्दी पोलिसांना कशी दिसली नाही? असाही सवाल आता उपस्थित होते आहे.