लखनौ :उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांनी आज प्रयागराजमधील 76 फ्लॅटच्या चाव्या लाभार्थ्यांना सुपूर्द केल्या आहेत. माफिया अतिक अहमदने कब्जा केलेली जागा परत मिळवून सरकारने या जमिनीवर हे फ्लॅट्स बांधले आहेत. यावेळी मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ म्हणाले की, 2017 पूर्वी या राज्यातील माफिया सरकारी जमिनींवर कब्जा करायचे, पण आज आम्ही माफियांपासून मुक्त झालेल्या जमिनीवर गरिबांसाठी घरे बांधत आहोत.
प्रधानमंत्री आवास योजना (शहरी) अंतर्गत सदनिका बांधण्यात आल्या असून 9 जून रोजी सोडतीद्वारे त्यांचे वाटप करण्यात आले होते. आज मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांच्या हस्ते लाभार्थ्यांना त्यांची घरे देण्यात आली. यावेळी मुख्यमंत्री योगी म्हणाले, "हे तेच राज्य आहे जिथे 2017 पूर्वी कोणताही माफिया गरीब, व्यापारी किंवा अगदी सरकारी संस्थांच्या जमिनी हडप करू शकत होता. तेव्हा गरीब फक्त लाचार होऊन पाहत असे. आता आम्ही माफियांकडून परत मिळवलेल्या जमिनींवर गरिबांसाठी घरे बांधत आहोत.
अतिशय स्वस्तात घरेलाभार्थ्यांना 41 चौरस मीटर जागेतील फ्लॅट केवळ 3.5 लाख रुपयांमध्ये देण्यात आले आहेत. एएनआय या वृत्तसंस्थेने दिलेल्या वृत्तानुसार, दोन खोल्या, स्वयंपाकघर आणि शौचालयाची सुविधा असलेल्या फ्लॅटची किंमत किमान 6 लाख रुपये आहे, पण प्रयागराज विकास प्राधिकरण (PDA) ने सोडतीअंतर्गत हे फ्लॅट अतिशय स्वस्तात लाभार्थांना दिले आहेत.
सीएम योगी आदित्यनाथ यांनी 2020 मध्ये प्रयागराजच्या लुकरगंज भागात असलेली ही जमीन अतिक अहमदच्या ताब्यातून मुक्त केली होती. यानंतर 26 डिसेंबर 2021 रोजी 1,731 चौरस मीटर जागेवर या गृहनिर्माण प्रकल्पाची पायाभरणी केली. आता हे फ्लॅट लाभार्थ्यांना मिळाले आहेत.
अतिक अहमदचा खात्मा2005 मध्ये बहुजन समाज पक्षाचे (BSP) आमदार राजू पाल यांच्या हत्येप्रकरणी अतिक अहमद आणि त्याचा भाऊ अशरफ आरोपी होते. या वर्षी फेब्रुवारीमध्ये याच प्रकरणातील प्रमुख साक्षीदार उमेश पाल याची हत्या करण्यात आली. या प्रकरणातही अतिक, त्याचा भाऊ आणि त्याचा मुलगा मुख्य आरोपी होते. पोलिसांनी अतिकच्या मुलाचा चकमकीत खात्मा केला, त्यानंतर काही दिवसातच काही हल्लेखोरांनी अतिक आणि अशरफची हॉस्पिटलमध्ये नेत असताना गोळ्या झाडून हत्या केली.