उत्तर प्रदेशमधील बरेली जिल्ह्यात १४ महिन्यांमध्ये १० महिलांची हत्या करणारा सायको सीरियल किलर हा अखेर पोलिसांच्या तावडीत सापडला आहे. मिळालेल्या माहितीनुसार आरोपी सीरियल किलर हा नवाबगंज ठाण्याच्या हद्दीतील रहिवासी आहे. या प्रकरणी पोलिसांनी आरोपीचे तिन स्केच प्रसिद्ध केले होते. आरोपी हा त्यापैकीच एक असल्याचा अंदाज वर्तवला जात आहे.
उत्तर प्रदेशमधील शाही शीशगड आमि फतेहगंज पश्चिम पोलीस ठाण्याच्या हद्दीत २०२३ मध्ये ९ महिलांची हत्या झाली होती. त्यावेळी हत्येची पद्धत एकसारखीच दिसून येत असल्याने पोलिसांनी या हत्या एखाद्या सीरियल किलरने केल्या असाव्यात असा संशय व्यक्त केला होता. त्यानंतर आरोपीला अटक करण्यासाठी पोलिसांकडून मोठ्या प्रमाणावर फौजफाटा तैनात करण्यात आला होता. त्यानंतर या हत्यांचं सत्र थांबलं होतं. मात्र यावर्षी २ जुलै रोजी पुन्हा एकदा एका महिलेचा मृतदेह शेतात सापडला. तसेच तिची हत्याही आधीच्या हत्यांप्रमाणेच करण्यात आली होती. त्यामुळे संशयाची सुई पुन्हा एकदा सीरियल किलरकडे वळली. तसेच पोलिसांनी लोकांकडे चौकशी करून तीन स्केच प्रसिद्ध केले होते.
दरम्यान, गतवर्षी शीशगड आणि शाही क्षेत्रामध्ये नदीच्या किनाऱ्याजवळ महिलांचे एकापाठोपाठ एक खून झाल्याने खळबळ उडाली होती. त्यात ५ जून रोजी शाही गावात कलावती नावाच्या महिलेची हत्या झाली होती. तर १९ जून रोजी शाही रोडजवळ धनवती नावाच्या महिलेचा मृतदेह सापडला होता. ३० जून रोजी शाही येथील आनंदपूर येथे प्रेमवतीचा मृतदेह सापडला होता. तर २२ जून रोजी खजुरिया गावामध्ये कुसुमा नावाच्या महिलेचा मृतदेह सापडला, २३ ऑगस्ट रोजी ज्वालापूर येथे वीरवती नावाच्या महिलेचा मृतदेह सापडला होता. ३१ ऑक्टोबर रोजी लखीमपूर येथे ६० वर्षीय महिलेची हत्या करण्यात आली. तर २० नोव्हेंबर रोजी खरसैनी गावात ६० वर्षांच्या दुलारो देवी या महिलेची हत्या झाली होती. २६ नोव्हेंबर रोजी जगदीशपूर येथे ५५ वर्षांच्या उर्मिला नावाच्या महिलेची हत्या झाली होती. या सर्व महिलांच्या हत्या ह्या गळ्याला फास लावून झाल्या होत्या.