उत्तर प्रदेशमधील झाशी येथे हँडपंपधून पाण्याऐवजी दारू बाहेर येत असल्याचं पाहून पोलिसांसह तिथे उपस्थित असलेले लोक अवाक् झाले. जेव्हा सखोलपणे याची पडताळणी करण्यात आली तेव्हा संपूर्ण प्रकार समोर आला. त्यानंतर पोलीस आणि आबकारी विभागाच्या पथकाने कारवाई केली. घटनास्थळावरून दोन महिलांना अटक करण्यात आले आहे. त्यांच्यावर बेकायदेशीर पद्धतीने मद्यनिर्मिती करणे आणि विकण्याचा आरोप ठेवण्यात आला आहे. तसेच या प्रकरणात फरार असलेल्या आरोपींचा पोलिसांकडून शोध घेतला जात आहे.
बैकायदेशीर मद्यविक्रीची माहिती मिळाल्यानंतर पोलीस आणि आबकारी विभागाच्या पथकाने झाशीमधील मोठ तालुक्यातील परगोना कबुतरा डेरा येथे धडक दिली. तिथे त्यांना एक हँडपंप दिसला. मात्र धक्कादायक बाब हा हँडपंप चालवल्यानंतर समोर आली. हा हँडपंप चालवल्यानंतर तिथून पाण्याऐवजी दारू बाहेर येऊ लागली. हे दृश्य पाहून पोलीसही अवाक् झाले. मात्र जेव्हा सखोलपणे तपासणी करण्यात आली तेव्हा हँडपंपखाली मद्याचे ड्रम ठेवण्यात आले असल्याचे उघड झाले. त्याच ड्रममधून हँडपंपच्या माध्यमातून दारू बाहेर काढली जात होती. पोलिसांपासून वाचण्यासाठी ही क्लुप्ती लढवण्यात आली होती.
पोलीस अधिकाऱ्यांनी सांगितले की, बऱ्याच दिवसांपासून बेकायदेशील कच्च्या दारूच्या विक्रीची माहिती मिळत होती. जेव्हा याचा तपास करण्यासाठी पोहोचलो तेव्हा कुठेही दारू दिसत नव्हती. त्याचदरम्यान शेतामध्ये एक हँडपंप दिसून आला. जेव्हा जवळ जाऊन हा हँडपंप चालवला तेव्हा त्यामधून पाण्याऐवजी दारू बाहेर येऊ लागली. त्यानंतर थोडं खोदून पाहिलं असता, हा हँडपंप केवळ दिखाव्यासाठी लावला, असल्याचे दिसून आले. तसेच त्याच्याखाली मद्याने भरलेले ड्रम असल्याचे समोर आले. त्यामधूनच मद्य बाहेर काढलं जात होतं.