उत्तर प्रदेशातील हाथरसमधील रतिभानपूर येते सत्संगाच्या कार्यक्रमादरम्यान झालेल्या चेंगराचेंगरीत जवळपास 100 जणांचा मृत्यू झाल्याचे वृत्त आहे. मृतांमध्ये अधिकांश महिला आणि बालकांचा समावेश असल्याचे समजते. यातच, या दुर्घटनेत क्विक रिस्पॉन्स टीमच्या (क्यूआरटी) ड्युटीवर तैनात पोलीस शिपाई रवी यादव यांचाही हृदयविकाराच्या झटक्याने मृत्यू झाला आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, रवि यादव हे मृतदेहांची व्यवस्था लावण्याच्या ड्यूटीवर तैनात होते. एकच वेळी एवढ्या मोठ्या प्रमाणावर मृतदेह बघितल्याने त्यांना हृदयविकाराचा झटका आला आणि त्यांचा मृत्यू झाला.
हेल्पलाइन नंबर जारी -या दुर्घटनेनंतर, हाथरस जिल्हा प्रशासनाने सर्वसामान्य लोकांच्या मदतीसाठी हेल्पलाइन नंबरही जारी केले आहेत. ते 05722227041 तथा 05722227042 असे आहेत.
बुधवारी घटनास्थळी पोहोचणार मुख्यमंत्री -हाथरस दुर्घटनेसंदर्भात मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांनी दु:ख व्यक्त केले असून, घटनेच्या चौकशीचे आदेश दिले आहेत. अधिकाऱ्यांना तातडीने घटनास्थळी पोहोचून मदत कार्याला वेग आणण्याची सूचना देण्यात आली आहे. याच बरोबर, जखमींवर योग्य उपचार करण्याचे आदेशही त्यांनी दिले आहेत. याशिवाय, मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ बुधवारी घटनास्थळी जाऊन घटनेचा आढावा घेतील. ते येथे पीडित कुटुंबांची भेट घेतील. यावेळी मुख्यमंत्र्यांसोबत मुख्यसचिवही उपस्थित राहतील.
मृतांच्या कुटुंबीयांना प्रत्येकी २ लाख, जखमींना ५० हजार रुपयांची मदत -तसेच मृतांच्या कुटुंबीयांना प्रत्येकी २ लाख आणि जखमींना प्रत्येकी ५० हजार रुपयांची मदत देण्याचे आदेश देण्यात आले आहेत. दरम्यान, कार्यक्रमाच्या आयोजकांविरोधाक एफआयआर दाखल करून कारवाई करण्याची तयारी शासनाकडून करण्यात येत आहे. तसेच या दुर्घटनेची चौकशी करण्यासाठी एका समितीची स्थापना करण्यात आली आहे.