यंदाच्या लोकसभा निवडणुकीत सर्वात धक्कादायक निकाल हे उत्तर प्रदेशमध्ये लागले आहेत. समाजवादी पक्ष आणि काँग्रेसच्या आघाडीने भाजपाला धोबीपछाड दिला आहे. दरम्यान, उत्तर प्रदेशमधील सहारनपूर येथे काँग्रेसचे उमेदवार इम्रान मसूद यांच्या समर्थकांनी रस्त्यावर हुल्लडबाजी केल्याची बाब समोर आली आहे. तसेच या घटनेचा व्हिडीओ व्हायरल झाला आहे. या व्हिडीओमध्ये दुचाकीवर स्वार झालेले शेकडो लोक रस्ता अडवून घोषणाबाजी करताना दिसत आहेत. दरम्यान, व्हिडीओ व्हायरल झाल्यानंतर आता पोलिसांनी सुमारे ५० अज्ञात लोकांविरोधात गुन्हा दाखल केला आहे.
सहारनपूर लोकसभा मतदारसंघामद्ये काँग्रेस-सपा आघाडीचे उमेदवार इम्रान मसूद यांनी दणदणीत विजय मिळवला आहे. त्यांना ५ लाख ४७ हजार ९६७ मतं मिळाली. तर त्यांचे जवळचे प्रतिस्पर्धी असलेल्या भाजपाच्या राघव लखनपाल यांना ४ लाख ८३ हजार ४२५ मतं मिळाली. अशा प्रकारे इम्रान मसूद यांनी ६४ हदार ५४२ मतांनी विजय मिळवला. तर बसपाचे माजिद अली हे तिसऱ्या क्रमांकावर राहिले. त्यांना १ लाख ८० हजार ३५३ मतं मिळाली.
दरम्यान, इम्रान मसूद यांच्या विजयानंतर उत्साहित झालेले कार्यकर्ते रस्त्यावर उतरले. त्यांनी बाईक रॅली काढली. अचानक काढलेल्या या रॅलीमुळे रस्त्यावर ट्रॅफिक जॅम झाला. या कार्यकर्त्यांकडून मोठ्या प्रमाणात घोषणाबाजी होत होती. मिळत असलेल्या माहितीनुसार हा व्हिडीओ हा ४ जून रोजी रात्रीचा आहे. तसेच अंबाला रोड येथील कुतबशेर ठाण्याजवळचा आहे. या व्हिडीओमध्ये दुचाकीवर स्वार झालेले हुल्लडबाज गोंधळ घालताना दिसत आहेत.