- बाळकृष्ण परबलोकसभा सदस्यसंख्येच्या दृष्टीने सर्वात मोठं राज्य असलेल्या उत्तर प्रदेशमध्ये मागच्या दोन लोकसभा निवडणुकांमध्ये भाजपाने विरोधी पक्षांना पुरते भुईसपाट केले होते. उत्तर प्रदेशात उसळेल्या मोदीलाटेचा काँग्रेसबरोबरच समाजवादी पक्ष आणि बहुजन समाजवादी पक्ष या स्थानिक पक्षांना मोठा फटका बसला होता. मागच्या लोकसभा निवडणुकीत तर सपा आणि बसपा एकत्र येऊनही भाजपा आणि मोदींना थोपवू शकले नव्हते. आता यंदाच्या लोकसभा निवडणुकीत अखिलेश यादव यांनी इंडिया आघाडीच्या माध्यमातून काँग्रेसला सोबत घेत मोदी आणि भाजपाविरोधात आघाडी उघडली आहे. पीडीए अर्थात पिछडा, दलित आणि अल्पसंख्याक हा फॉर्म्युला वापरून भाजपाला धोबीपछाड देण्याचं गणित अखिलेश यादव यांनी मांडलं आहे. मात्र पिछडे अर्थात मागास आणि ओबीसींचं राजकारणात करणाऱ्या अखिलेश यादव यांच्या समाजवादी पक्षामध्ये परिवारवादालाही प्राधान्य दिल्याचं यंदाच्या लोकसभा निवडणुकीत प्रकर्षानं दिसून येत आहे. यावेळी समाजवादी पक्ष उत्तर प्रदेशमध्ये ६२ जागा लढवत आहे. यापैकी ५ उमेदवार हे अखिलेश यादव यांच्या कुटुंबातीलच आहेत. त्यामध्ये स्वत: अखिलेश यादव, त्यांच्या पत्नी डिंपल यादव आणि तीन चुलत भावांचा समावेश आहे.
उत्तर प्रदेशातील यादव बहूल असलेले काही मतदारसंघ हे पूर्वीपासून समाजवादी पक्षाचे बालेकिल्ले समजले जातात. त्यापैकी फिरोजाबाद, मैनपूरी, बदायूँ, कन्नौज आणि आझमगड येथून मुलायम सिंह आणि त्यांच्या कुटुंबातील व्यक्तीच सातत्याने निवडणूक लढवत आल्या आहेत. यावेळीही समाजवादी पक्षाकडून फिरोजाबादमधून अक्षय यादव, मैनपूरीमधून डिंपल यादव, बदायूँ येथून आदित्य यादव, कन्नौज येथून अखिलेश यादव आणि आझमगडमधून धर्मेंद्र यादव हे मुलायम सिंह यांच्या कुटुंबातील सदस्य रिंगणात आहेत. या यादव मतदारांची संख्या लक्षणीय असलेल्या या मतदारसंघांमध्ये मुलायम सिंह यांच्या कुटुंबातील सदस्य रिंगणात असल्यावर निवडणूक जिंकणं सोपं जातं हे सरळ गणित आहे.
२०१४ मध्ये उत्तर प्रदेशात उसळलेल्या मोदी लाटेमध्ये बसपाचा पूर्णपणे सफाया झाला होता. मात्र समाजवादी पक्ष पाच जागा जिंकण्यात यशस्वी ठरला होता. त्यावेळी निवडून आलेले पाचही सदस्य हे यादव कुटंबातील आणि वरील पाच मतदासंघातीलच होते. त्यावेळी फिरोजाबाद येथून अक्षय यादव, मैनपुरीमधून तेजप्रताप सिंह यादव, बदायूँ येथून धर्मेंद्र यादव, कन्नौय येथून डिंपल यादव आणि आझमगड येथून मुलायम सिंह यादव हे विजयी झाले होते. पण २०१९ च्या निवडणुकीत मात्र हे चित्र बदललं होतं. त्यावेळी समाजवादी पक्षाने २०१४ मध्ये जिंकलेल्या या पाच बालेकिल्ल्यांपैकी तीन ठिकाणी भाजपाने यादवांना धक्का दिला होता. फिरोजाबाद, कन्नौज आणि बदायूँ येथे अटीतटीच्या लढाईत भाजपाचे उमेदवार विजयी झाले होते. तर पुढे अखिलेश यादव यांनी खासदारकीचा राजीनामा दिल्याने आझमगडमध्ये झालेल्या पोटनिवडणुकीत भाजपाने अभिनेता दिलेशलाल यादव याला उमेदवारी देत समाजवादी पक्षाचा हा बालेकिल्लाही सर केला होता. त्यामुळे या लोकसभा निवडणुकीत भाजपाचं आव्हान परतवून हातातून निसटलेले बालेकिल्ले पुन्हा मिळवण्याचं आव्हान अखिलेश यादव आणि समाजवादी पक्षासमोर असणार आहे.
या निवडणुकीत फिरोजाबादमध्ये समाजवादी पक्षाच्या अक्षय यादव यांचा सामना भाजपाच्या ठाकूर विश्वदीप सिंह यांच्याशी होईल. तर यावेळी डिंपल यादव मैनपुरीमधून निवडणूक लढवणार असून, त्यांच्यासमोर भाजपाच्या ठाकूर जयवीर सिंह यांचं आव्हान असेल. तर बदायूँ येथून निवडणूक लढवत असलेल्या आदित्य यादव यांच्यासमोर भाजपाकडून दुर्विजय सिंह शाक्य यांना उमेदवारी देण्यात आली आहे. कन्नौजमध्ये अनेक उलथापालथींनंतर अखिलेश यादव यांनी निवडणूक लढवण्याचा निर्णय घेतला आहे. त्यांच्यासमोर भाजपाच्या सुब्रत पाठक यांचं आव्हान असेल. तर आझमगडमध्ये धर्मेंद्र यादव यांचा सामना भोजपुरी अभिनेते दिनेशलाल यादव यांच्याशी होणार आहे. यावेळी भाजपाचं आव्हान परतवण्यासाठी अखिलेश यादव यांनी पीडीए फॉर्म्युला अंमलात आणला आहे. तसेच जातिनिहाय जनगणना, आरक्षण आणि संविधान या मुद्द्यांवर त्यांच्याकडून भर दिला जात आहे. भाजपा पुन्हा सत्तेत आल्यास आरक्षण रद्द होईल, तसेच संविधान बदललं जाईल, अशी भीती ते भाषणांमधून व्यक्त करत आहेत. या माध्यमातून आरक्षण आणि संविधानाबाबत संवेदनशील असलेला मागासवर्ग आपल्या बाजूने वळेल आणि त्याचा फायदा आपल्याला होईल, असा त्यांचा अंदाज आहे. आता त्याला मतदारांकडून कसा प्रतिसाद मिळतो यावर समाजवादी पक्षाचं या पाच मतदारसंघांसह संपूर्ण उत्तर प्रदेशातील भवितव्य अवलंबून असेल.