उत्तर प्रदेशमध्ये भाजपाला पराभूत करण्यासाठी इंडिया आघाडीची मोट बांधणाऱ्या अखिलेश यादव यांना उमेदवार देताना चांगलीच कसरत करावी लागत आहे. मेरठसारख्या काही ठिकाणी अखिलेश यादव यांनी तीन तीन वेळा आपला उमेदवार बदलला आहे. तर आणखी काही मतदारसंघात उमेदवारीवरून घोळ सुरू आहे. त्यातच आता समाजवादी पक्षाचा बालेकिल्ला समजल्या जाणाऱ्या कन्नौजमध्येही सपाकडून उमेदवार बदलण्याची तयारी सुरू असल्याचे समोर येत आहे. कन्नौजमध्ये सपाकडून लालूप्रसाद यादव यांचे जावई आणि अखिलेश यादव यांचे पुतणे तेजप्रताप यादव यांना उमेदवारी देण्यात आली होती. मात्र आता त्यांची उमेदवारी रद्द करून तिथे अखिलेश यादव यांचं नाव उमेदवार म्हणून जाहीर करण्यात आलं आहे. तसेच अखिलेश यादव हे २५ एप्रिल रोजी आपला उमेदवारी अर्ज दाखल करणार आहेत.
सोमवारी समाजवादी पार्टीकडून तेजप्रताप यादव यांना कन्नौज मतदारसंघातून उमेदवारी जाहीर करण्यात आली होती. तर बलिया येथे भाजपाच्या नीरज शेखर यांच्याविरोधात सनातन पांडेय यांना तिकीट देण्यात आले होते. मात्र दोन दिवसांमध्येच हा निर्णय बदलून कन्नौज येथून अखिलेश यादव यांनाच निवडणुकीच्या रिंगणात उतरवण्याचा निर्णय घेण्यात आला.
तेजप्रताप यादव हे अखिलेश यादव यांचे पुतणे आणि बिहारमधील राष्ट्रीय जनता दलाचे प्रमुख लालूप्रसाद यादव यांचे जावई आहेत. तेजप्रताप यादव हे याआधी मैनपुरी मतदारसंघातून खासदार म्हणून निवडून आले होते. २०१४ मध्ये मुलायम सिंह यादव हे आझमगड आणि मैनपुरी या दोन्ही मतदारसंघातून विजयी झाल्यानंतर त्यांनी मैनपुरीच्या जागेचा राजीनामा दिला होता. त्यानंतर झालेल्या पोटनिवडणुकीमध्ये समाजवादी पक्षाने तेजप्रताप यादव यांना उमेदवारी दिली होती. त्या निवडणुकीत विजय मिळून तेजप्रताप हे लोकसभेत पोहोचले होते. मात्र २०१९ मध्ये समाजवादी पक्षाने त्यांना उमेदवारी दिली नव्हती. आता २०२४ च्या लोकसभा निवडणुकीसाठी तेजप्रताप यादव यांना पुन्हा संधी देण्यात आली होती. मात्र त्यांच्या नावाची घोषणा झाल्यानंतर कार्यकर्त्यांकडून अखिलेश शादव यांना निवडणूक लढवण्याची विनंती करण्यात आली होती. त्यानंतर अखिलेश यादव यांनी निवडणूक लढवण्याच निर्णय घेतला आहे.