लोकसभा निवडणुकीमध्ये प्रचारासाठी मोठ्या पक्षांसह इतर उमेदवार हे वेगवेगळ्या क्लुप्त्या लढवत असतात. त्यातीत काही उमेदवार त्यांच्या हटके प्रचारशैलीमुळे मतदारांचं लक्ष वेधून घेत असतात. यामध्ये हौस म्हणून निवडणूक लढवणाऱ्या अपक्ष उमेदवारांची संख्या लक्षणीय असते. असाच काहीचा प्रकार उत्तर प्रदेशमधील अलिगड लोकसभा मतदारसंघामध्ये दिसून ययेत आहे. येथे एक अपक्ष उमेदवार गळ्यात चपलांची माळ घालून निवडणुकीचा प्रचार करत आहे. पंडित केशव देव गौतम असं या उमेदवाराचं नाव आहे.
पंडित केशव देव गौतम हे गळ्यात चपलांचा हार घालून प्रचार करण्याचं कारण म्हणजे निवडणूक आयोगाकडून त्यांना चप्पल हे चिन्ह मिळालं आहे. अलिगड लोकसभा मतदारसंघामध्ये सोमवारी उमेदवारी अर्ज मागे घेण्याची प्रक्रिया पूर्ण झाली आहे. ही प्रक्रिया पूर्ण झाल्यानंतर १४ उमेदवार रिंगणात उरले आहेत. यादरम्यान ५ उमेदवारांचे अर्ज बाद झाले. तर दोघांनी आपलं नाव मागे घेतलं आहे.
अलीगड लोकसभा मतदारसंघामध्ये तब्बल ३.५ लाख मुस्लिम मतदार आहेत. मात्र कुठल्याही मोठ्या पक्षाने मुस्लिम व्यक्तीला उमेदवारी दिलेली नाही. भाजपाकडून येथे सतीशकुमार गौतम हे निवडणूक लढवत आहेत. तर विरोधी पक्षांच्या इंडिया आघाडीच्यावतीने समाजवादी पक्षाने बिजेंद्र सिंह यांना अलिगडमधून उमेदवारी दिली आहे. स्वतंत्रपणे निवडणूक लढवत असलेल्या बसपाने हितेंद्र कुमार उर्फ बंटी उपाध्याय रिंगणात आहेत.
अलिगड लोकसभा मतदारसंघाचा इतिहास पाहिल्यास १९९१ पासून येथे भाजपाचा दबदबा राहिलेला आहे. तसेच १९९१ आजपर्यंत झालेल्या ८ लोकसभा निवडणुकांपैकी ६ निवडणुकांमध्ये भाजपाने विजय मिळवला आहे. १९९१ ते १९९९ या काळात शीला गौतम यांनी येथून सलग ४ वेळा विजय मिळवला. तर २००४ मध्ये काँग्रेस आणि २००९ मध्ये बसपाचा विजय झाला होता. मात्र २०१४ च्या मोदीलाटेमध्ये भाजपाने पुन्हा एकदा या मतदारसंघावर कब्जा केला.