लोकसभा निवडणुकीच्या मतमोजणीमध्ये उत्तर प्रदेशात भाजपाला मोठा धक्का बसला आहे. उत्तर प्रदेशमधील अनेक मतदारसंघात समाजवादी पक्ष आणि काँग्रेसचे उमेदवार आघाडीवर आहेत. एवढंच नाही तर भाजपाने फारमोठा गाजावाजा केलेल्या अयोध्येमध्येही भाजपाला फार मोठा धक्का बसताना दिसत आहे. सुरुवातीच्या कलांनुसार अयोध्या ज्या फैजाबाद लोकसभा मतदारसंघात येते तिथे भाजपाचे उमेदवार लल्लू सिंह हे ६२२३ मतांनी पिछाडीवर पडले आहेत. तेथे समाजवादी पक्षाचे उमेदवार अवधेश प्रसाद यांनी आघाडी घेतली आहे.
फैजाबाद लोकसभा मतदारसंघात आतापर्यंत झालेल्या मतमोजणीमध्ये समाजवादी पक्षाचे अवधेश प्रसाद यांना १ लाख १८ हजार ९५५ मतं मिळाली आहेत. तर भाजपाच्या लल्लू सिंह यांना १ लाख १३ हजार १६८ मतं मिळाली आहेत. दरम्यान, उत्तर प्रदेशमधून समोर आलेल्या आतापर्यंतच्या कलांनुसार उत्तर प्रदेशमधील ८० जागांपैकी ३७ जागांवर भाजपा, ३२ जागांवर समाजवादी पक्ष, काँग्रेस ८, आरएलडी २ आणि इतर पक्ष एका जागेवर आघाडीवर आहेत.
लोकसभा सभासद संख्येच्या दृष्टीने देशातील सर्वात मोठं राज्य असलेल्या उत्तर प्रदेशात यंदाच्या लोकसभा निवडणुकीत भाजपा आणि सपा व काँग्रेसचा समावेश असलेल्या इंडिया आघाडी यांच्यात अगदी चुरशीची लढत झाली होती. तर मायावतींचा बहुजन समाज पक्षही येथे लढतीत होता. लोकसभेच्या ८० जागा असलेल्या उत्तर प्रदेशमध्ये भाजपा ७५ आणि भाजपाचे मित्र पक्ष ५ जागांवर निवडणूक लढवत आहे. तर इंडिया आघाडीकडून समाजवादी पक्ष ६२, काँग्रेस १७ आणि तृणमूल काँग्रेस एक जागा लढवत आहे.