राम मंदिर आणि उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांना बॉम्बने उडवून देण्याची धमकी देणाऱ्या दोन आरोपींना अटक करण्यात आली आहे. उत्तर प्रदेश एसटीएफने ही कारवाई केली असून, दोघांना विभूतीखंडमधून अटक केली आहे. आरोपींची ओळख पटवण्यात पोलिसांना यश आले. ताहर सिंग हा गोंडा येथील विशंभरपूर गावचा रहिवासी आहे. तर, ओम प्रकाश मिश्रा हा बामडेरा येथील आहे. आरोपींनी स्वत: जुबेर खान असल्याचे सांगून धमकी दिली होती. आरोपींकडून अनेक मोबाईल फोन आणि इतर साहित्य जप्त करण्यात आले आहे.
आलमबाग येथील रहिवासी भारतीय किसान मंचचे राष्ट्रीय अध्यक्ष देवेंद्र तिवारी यांना २७ डिसेंबर रोजी पाठवलेल्या मेलमध्ये श्री राम मंदिर आणि मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांना बॉम्बने उडवून देण्याची धमकी देण्यात आली होती. याशिवाय काही अज्ञात व्यक्तींनी डायल ११२ वर फोन करून राम मंदिर आणि मुख्यमंत्र्यांना बॉम्बने उडवून देण्याची धमकी दिली होती. या संदर्भात डीसीपी पूर्व यांनी गुन्हा दाखल करण्यात आला असल्याची माहिती दिली होती.
या धमकी प्रकरणावरून समाजवादी पार्टीचे राष्ट्रीय अध्यक्ष अखिलेश यादव यांनी सरकारला लक्ष्य केले. 'तेच षडयंत्र रचतात आणि तक्रारही तेच करतात', अशा शब्दांत अखिलेश यांनी राज्य सरकारवर निशाणा साधला.
दरम्यान, धमकीचा मेल आल्यानंतर लखनौ येथील सुशांत गोल्फ सिटी पोलीस ठाण्यात याप्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला होता. भारतीय किसान मंच आणि राष्ट्रीय गो परिषदेशी संबंधित देवेंद्र तिवारी यांना २७ डिसेंबर रोजी दुपारी २.०७ वाजता एक ई-मेल आला होता. त्यामध्ये आरोपींनी आपत्तीजनक शब्दांचा वापर केला. तसेच आरोपींनी अयोध्येतील श्रीराम मंदिर, उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ आणि एटीएस प्रमुख अमिताभ यश यांना बॉम्बने उडविण्याची धमकी दिली होती.