आता ‘युपी जोडो यात्रा’; लोकसभेसाठी काँग्रेसने कंबर कसली, ३६ सदस्यीय समिती स्थापन

By ऑनलाइन लोकमत | Published: December 16, 2023 09:06 AM2023-12-16T09:06:06+5:302023-12-16T09:07:49+5:30

Loksabha Election 2024: युपी जोडो यात्रेसाठी राहुल गांधी, प्रियंका गांधी यांना निमंत्रणे पाठवले असल्याची माहिती देण्यात आली आहे.

uttar pradesh up jodo yatra congress ready for lok sabha election 2024 36 member committee formed | आता ‘युपी जोडो यात्रा’; लोकसभेसाठी काँग्रेसने कंबर कसली, ३६ सदस्यीय समिती स्थापन

आता ‘युपी जोडो यात्रा’; लोकसभेसाठी काँग्रेसने कंबर कसली, ३६ सदस्यीय समिती स्थापन

Loksabha Election 2024: अलीकडेच झालेल्या विधानसभा निवडणुकांमध्ये काँग्रेसला पराभवाचा सामना करावा लागला. छत्तीसगड आणि राजस्थान या राज्यातील काँग्रेसची सत्ता खालसा झाली आणि भाजपने बाजी मारली. तर मध्य प्रदेशातही काँग्रेसला फारशी चांगली कामगिरी करता आली नाही. या सर्व गोष्टी मागे सारून काँग्रेसने आता लोकसभा निवडणुकीसाठी कंबर कसली आहे. काँग्रेस नेते आणि खासदार राहुल गांधी यांच्या भारत जोडो यात्रेच्या यशानंतर आता युपी जोडो यात्रा काढली जाणार आहे. यासाठी ३६ सदस्यीय समितीची स्थापना करण्यात आली आहे. 

लोकसभा निवडणुकीसाठी उत्तर प्रदेश अतिशय महत्त्वाचे मानले जाते. यासाठी काँग्रेस युपी जोडो यात्रा काढत आहे. २० डिसेंबरपासून या यात्रेची सुरुवात होणार आहे. या यात्रेचे आयोजन, नियोजनासाठी ३६ सदस्यीय समिती स्थापन करण्यात आल्याची माहिती देण्यात आली आहे. या समितीचे अध्यक्ष ज्येष्ठ नेते योगेश दीक्षित असणार आहेत. पश्चिम उत्तर प्रदेशातील सहारनपूर जिल्ह्यातून ही यात्रा सुरू होणार असून, मुझफ्फरनगर, बिजनोर, अमरोहा, मुरादाबाद, रामपूर, बरेली, शाहजहांपूर, लखीमपूर खेरी, सीतापूर या भागातून ही यात्रा जाणार आहे. १० जानेवारी रोजी या यात्रेची सांगता करण्यात येणार आहे. 

जास्तीत जास्त लोकांच्या सहभागावर भर

उत्तर प्रदेश जोडो यात्रेत जास्तीत जास्त लोक सहभागी होतील याची सुनिश्चिती करण्यासाठी समिती काम करेल, असे एका काँग्रेस नेत्याने सांगितले. या यात्रेचा उद्देश सरकारकडून दुर्लक्षित समाजातील घटकांपर्यंत पोहोचणे आहे. उत्तर प्रदेशमध्ये शेतकरी आणि तरुण संघर्ष करत आहेत. मुस्लिम समुदायावर वेगवेगळ्या भागातून वारंवार हल्ले होत आहेत. त्यामुळे यावर आमचे लक्ष असेल, अशी माहिती काँग्रेस नेत्यांकडून देण्यात आली. 

दरम्यान, सुमारे २० ते २२ दिवस चालणारी ही पदयात्रा ११ जिल्ह्यांतून जाणार आहे. या यात्रेच्या माध्यमातून सुमारे १५ लोकसभा मतदारसंघांवर लक्ष केंद्रीत केले जाणार आहे. गंगोहपासून सुरू होणारी ही यात्रा सीतापूर येथील नैमिषारण्य या तीर्थक्षेत्री संपवण्याची योजना आहे. जनतेच्या समस्या मांडण्यासाठी जाहीर सभा घेऊन सर्वसामान्यांना पक्षाशी जोडण्यावर भर दिला जाणार आहे. या यात्रेत सहभागी होण्यासाठी प्रदेश समितीने राहुल गांधी, प्रियांका गांधी आणि इतर ज्येष्ठ नेत्यांनाही निमंत्रण पाठवले आहे.
 

Web Title: uttar pradesh up jodo yatra congress ready for lok sabha election 2024 36 member committee formed

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.