उत्तर प्रदेशच्या सुलतानपूर येथे धक्कादायक घटना शनिवारी रात्री घडली. जेवण मागितले म्हणून एका महिलेने नवऱ्याला घराच्या टेरेसावरून खाली फेकून दिले. याप्रकरणी पोलिसांनी महिलेला अटक केली असून पुढील तपासाला सुरुवात झाली. मुलाच्या मृत्यूनंतर त्याच्या आईने आरोपी सूनेवर अनेक गंभीर आरोप केले आहेत.
दिलशाद (वय, ४०), असे मृत्यू झालेल्या व्यक्ती नाव आहे. दिलशाह आपल्या कुटुंबियांसह सुलतानपूर जिल्ह्यातील रायबरेली- बांदा रस्त्यावरील अम्हाट येथील काशीराम कॉलनीत राहत होता. मिळालेल्या माहितीनुसार, घटनेच्या दिवशी दिलशादने आपल्या पत्नीकडे जेवण मागितले. परंतु, त्यामुळे दोघांमध्ये जोरदार भांडण झाले. हा वाद इतका पेटला की, रागाच्या भरात दिलशादच्या पत्नीने त्याला घराच्या टेरेसवरून खाली ढकलून दिले. या घटनेत दिलशादच्या डोक्याला गंभीर दुखापत झाली. कुटुंबियांनी ताबडतोब त्याला जवळच्या रुग्णालयात नेले. मात्र, तिथे डॉक्टरांनी त्याला मृत घोषित केले.
या घटनेची माहिती मिळताच स्थानिक पोलिसांनी घटनास्थळी धाव घेऊन पंचनामा केला. मृताच्या आईने दिलेल्या तक्रारीवरून आरोपी महिलेला अटक करण्यात आली. मृताच्या बहिणीने पोलिसांत दिलेल्या फिर्यादीत असे म्हटले आहे की, तिचा भाऊ वहिनीकडे जेवण मागत होता. काही वेळेनंतर आम्ही वहिनीला त्याला टेरेसावरून खाली ढकलून देताना पाहिले. वहिनीचे माझ्या भावावर प्रेम नव्हते. ती सतत त्याच्याशी भांडायची, असेही तिने म्हटले.
मृताच्या आईने आरोप केला आहे की, माझी सून सतत फोनवर बोलायची. यावरून त्याच्यांत अनेकदा वाद झाले. ती दोन-तीन वेळा पळून गेली होती. पण तरीही माझ्या मुलाने तिला स्वीकारले. घटनेच्या दिवशीही ती मोबाईलमध्ये बोलत असल्याने त्यांच्यात वादाला सुरुवात झाली. त्यानंतर तिने माझ्या मुलाला टेरेसवरून खाली ढकलून दिले.