लखनौ - समाजवादी पक्षाचे नेते आणि महासचिव स्वामी प्रसाद मौर्य यांच्यावर एकाने बुट फेकून मारल्याची घटना घडली आहे. आकाश सैनी नावाच्या युवकाने वकिलाच्या पोशाखात येऊन मौर्य यांच्यावर हा हल्ला केला. या हल्ल्यानंतर समाजवादी पक्षाच्या कार्यकर्त्याने सैनीला पकडून मारहाण केली. त्यानंतर, पोलिसांनी ताब्यात घेतलं आहे. समाजवादी पक्षाच्या ओबीसी महासंमेलनावेळी ही घटना घडली.
स्वामी प्रसाद मौर्य यांच्यावर बुटफेक केल्यानंतर समाजवादी पक्षाच्या कार्यकर्त्यांनी संबंधित व्यक्तीला जबर मारहाण केली. या घटनेचा व्हिडिओ समाजमाध्यमातून समोर आला आहे. त्यामध्ये, वकिलाच्या पोशाखातील त्या व्यक्तीला लाथा-बुक्क्यांनी आणि पट्ट्याने मारहाण करण्यात येत असल्याचे दिसून येते.
रामचरितमान ग्रंथाविरुद्ध विधान केल्यावरुन स्वामी प्रसाद मौर्य वादात अडकले होते. यंदाच्या फेब्रुवारी महिन्यातच त्यांच्यावर शाईफेक करण्यात आली होती. वाराणसी येथून सोनभद्रला जात असताना रस्त्यात स्वामी प्रसाद मौर्य यांच्या स्वागतासाठी कार्यकर्ते थांबले होते. हाती फुलांच्या माळा घेतलेले कार्यकर्ते पाहून मौर्य यांनी गाडीतून खाली उतरत सन्मान स्वीकारला. त्यानंतर, अगोदर फुलांचे हार गळ्यात घातले, नंतर काहीजणांनी मौर्य यांच्यावर शाईफेक केली होती. आता, पुन्हा एकदा त्यांच्यावर हल्ला करण्यात आला असून यावेळी बुट फेकून मारण्यात आला आहे.