लखनौ - पोलिसांबद्दल चित्रपटातून नेहमीच नकारात्मक दाखवले जाते. पोलिसांना व्हिलन बनवण्याचा प्रकार माध्यमातून घडतो, अशी नेहमीच ओरड असते. मात्र, उत्तर प्रदेशच्या कौशंबी जिल्ह्यातील एक धक्कादायक व्हिडिओ समोर आला आहे. ज्यामुळे, पुन्हा एकदा खाकी वर्दीला डाग लावण्याचं काम घडलंय. येथील एका पोलीस ठाण्यात पोलीस अधिकारी चक्क बनियान आणि लुंगी परिधान करुन कार्यालयात बसला आहे. विशेष म्हणजे अशाच अवतारात महिलांची तक्रार ऐकण्याचं काम करताना ते महाशय दिसून येतात.
कौशंबी येथील या पोलीस अधिकाऱ्याची वर्तणूक कॅमेऱ्यात कैद झाल्यानंतर त्यांना चांगलाच धडा मिळाला आहे. या घटनेचा व्हिडिओ व्हायरल झाला असून सोशल मीडियातून या महाशयांना ट्रोल केलं जात आहे. विशेष म्हणजे पोलीस अधिक्षकांनीही या व्हिडिओची दखल घेत संबंधित अधिकाऱ्यावर कारवाई केली. कोखराज तालुक्यातील सिंघिया पोलीस ठाण्यातील हा प्रकार असल्याचे उघडकीस आले.
मिळालेल्या माहितीनुसार, बालकमऊ गावात वादाची घटना घडली होती. ज्याची तक्रार करण्यासाठी काही महिला सिंघिया पोलीस ठाण्यात पोहोचल्या होत्या. त्यावेळी, या महिलांची फिर्याद ऐकून घेण्यासाठी पोलीस ठाणे प्रभारी राम नारायण सिंह हे बनियान आणि लुंगी परिधान करुन बसले होते. पोलीस अधिकाऱ्यांना अशा अवतारात पाहून महिलाही अचंबित झाल्या. मात्र, फिर्याद देणं ही गरज असल्याने महिलांनी प्रभारी अधिकारी यांच्यासमोर खुर्चीत बसून फिर्याद दिली. त्यावेळी, कुणीतरी या घटनेचा व्हिडिओ शूट केला आणि आता हा व्हिडिओ सोशल मीडियातून व्हायरल झाला आहे.
दरम्यान, हा व्हिडिओ व्हायरल झाल्यानंतर पोलीस अधिक्षकांनी या घटनेची दखल घेत संबंधित प्रभारी अधिकाऱ्यावर कारवाई केली. राम नारायण सिंह यांना संबंधित पोलीस ठाण्यातून हटविण्यात आले असून त्यांच्याजागी नवीन अधिकारी बसवण्यात आला आहे. तसेच, या घटनेच्या विभागीय चौकशीचे आदेशही देण्यात आले आहेत.