देशात सात टप्प्यात लोकसभा निवडणूक होणार आहे. शनिवारी राष्ट्रीय निवडणूक आयोगाने पत्रकार परिषद घेऊन लोकसभा निवडणुकीच्या तारखा जाहीर केल्या. लोकसभा निवडणुकीसाठी उत्तर प्रदेशमध्ये भाजप आणि राष्ट्रीय लोक दल (RLD) यांच्यात युती आहे. उत्तर प्रदेशातून देशातील सत्तेचा मार्ग जातो, तिथून ८० खासदार निवडून येतात. उत्तर प्रदेशात भाजप आणि आरएलडी दोन्ही पक्ष एकत्र निवडणूक लढवत आहेत. पण, निवडणुकीपूर्वी भाजप खासदार ब्रिजभूषण शरण सिंह यांच्याविरोधात आरएलडीने दंड थोपटले आहेत.
राष्ट्रीय लोक दलाचे नेते रोहित अग्रवाल म्हणाले की, आम्ही भाजप खासदार ब्रिजभूषण शरण सिंह यांना गुन्हेगार मानतो. खरं तर बागपत लोकसभा मतदारसंघातून आरएलडी उमेदवार डॉ. राजकुमार सांगवान यांना उमेदवारी दिल्याबद्दल त्यांचे अभिनंदन करणारे पोस्टर व्हायरल झाले. या पोस्टरवर कैसरगंज मतदारसंघातील भाजप खासदार ब्रिजभूषण शरण सिंह यांचा फोटो होता, आता या फोटोवर आरएलडीने तिखट प्रतिक्रिया दिली आहे.
रोहित अग्रवाल यांनी सोशल मीडियावर एक पोस्ट करत म्हटले की, आम्ही ब्रिजभूषण शरण सिंह यांना गुन्हेगार मानतो आणि म्हणूनच त्यांचे समर्थन करत नाही, चुकून त्यांचा फोटो एका कार्यकर्त्याने पोस्टरमध्ये वापरला आहे, ही केवळ एक चूक आहे आणि ते राष्ट्रीय लोक दलाचे अधिकृत पोस्टर नाही. राष्ट्रीय लोकदलाच्या कोणत्याही प्रचारात ब्रिजभूषण शरण सिंह यांचा वापर केला जाणार नाही.
दरम्यान, भारतीय कुस्ती महासंघाचे माजी अध्यक्ष आणि भाजप खासदार ब्रिजभूषण शरण सिंह यांच्यावर महिला कुस्तीपटूंनी लैंगिक छळाचे आरोप केले होते. त्यांच्यावर सात पैलवानांनी लैंगिक छळाचे दोन गुन्हे दाखल केले होते. यापैकी एक खटला एका अल्पवयीन कुस्तीपटूने दाखल केला होता. परंतु, नंतर तिने तिचा आरोप मागे घेतला. इतर कुस्तीपटूंच्या तक्रारीवरून दाखल झालेल्या गुन्ह्यात कलम ३५४, ३५४-अ आणि ड अंतर्गत आरोपपत्र दाखल करण्यात आले आहे. सिंह यांच्याविरोधातील आरोपांमुळे भारतीय कुस्ती महासंघ मागील काही काळ खूप चर्चेत होता.