खासदार वरुण गांधी हे गेल्या काही वर्षांपासून भाजपाविरोधात आक्रमक भूमिका घेत आहेत. त्यामुळे उत्तर प्रदेशमधील पीलिभीत येथील खासदार असलेले वरुण गांधी यांना भाजपा २०२४ च्या निवडणुकीत उमेदवारी देण्याची शक्यता कमी असल्याचं बोललं जात आहे. त्याचदरम्यान, आपल्या मतदारसंघाच्या दौऱ्यावर असलेल्या वरुण गांधी यांनी आपल्याच पक्षाकडून दिल्या जाणाऱ्या घोषणा, सरकारी योजनांची परिस्थिती आणि भ्रष्टाचार आणि बेरोजगारीबाबत प्रश्न उपस्थित केले आहेत.
वरुण गांधी यांनी घेतलेल्या आक्रमक भूमिकांमुळे ते आता आपली वेगळी वाट चोखाळण्याच्या विचारात आहेत, असे संकेत मिळत आहेत. वरुण गांधी म्हणाले की, जे लोक कर्ज परतफेड करू शकणार नाही. त्यांच्या मालमत्ता जप्त केल्या जातील. त्यांच्या संपत्तीचा लिलाव होईल. आता मी विचारतो की, यावर उपाय काय आहे. केवळ घोषणा? जय श्रीराम, भारत माता की जय अशा घोषणा देऊन काम भागणार आहे का? असा प्रश्न त्यांनी विचारला आहे.
वरुण गांधी पुढे म्हणाले की, मी सुद्धा भारतमातेला मानतो. मी हनुमानजींचा भक्त आहे. भगवान राम यांना आपले आराध्य मानतो. आता मी तुम्हाला विचारतो की, आज ज्या काही पायाभूत सुविधा आहेत, त्यामुळे प्रत्येक व्यक्ती त्रस्त आहे. यावर तोडगा घोषणाबाजी करून होणार आहे की, धोरणात्मक सुधारणांमुळे होणा आहे, असा सवालही त्यांनी विचारला.