वाराणसी : काशी विश्वनाथ मंदिराला लागून असलेल्या ज्ञानवापी परिसरात भारतीय पुरातत्व सर्वेक्षण (एएसआय) विभागाकडून करण्यात आलेल्या सर्वेक्षणाचा अहवाल जिल्हा न्यायालयाने गुरुवारी रात्री दहा वाजता पक्षकारांना दिला. या अहवालानुसार, ज्ञानवापीच्या सध्याच्या रचेनेपूर्वी येथे भव्य हिन्दू मंदिर होते, असे संकेत मिळतात. हा अहवाल सर्वाजनिक झाल्यानंतर, आता हिंदूंना तेथे पूजा-अर्चना करण्याची परवानगी मिळावी, अशी मागणी हिन्दू पक्षकारांकडून करण्यात आली आहे. तर मुस्लीम पक्षकारांनी कायदेशीर लढाई पुढे घेऊन जाणार असल्याचे म्हटले आहे.
सर्वेक्षणातील 10 महत्वाचे मुद्दे -1. मशिदीपूर्वी तिथे असलेल्या मंदिरात एक मोठा मध्यवर्ती हॉल आणि उत्तरेला एक छोटी रूम होती.2. 17 व्या शतकात, मंदिर पाडण्यात आले आणि त्याचा भाग मशिदीमध्ये समाविष्ट करण्यात आला.3. मशिदीच्या बांधकामात मंदिराच्या खांबांसह इतरही काही भागांचा फारसा बदल न करता वापर करण्यात आला.4. काही खांबांवरून हिंदू धर्माशी संबंधित चिह्न पुसण्याचा प्रयत्न करण्यात आला आहे.5. मशिदीची पश्चिमेकडील भिंत पूर्णपणे हिंदू मंदिराचा भाग आहे. 6. सर्वेक्षणात 32 शिलालेख आणि दगड सापडले आहेत, जे तेथे आधी हिंदू मंदिर होते, याचा पुरावा आहेत.7. शिलालेखांवर देवनागरी, तेलगू आणि कन्नड भाषेत लेख लिहिलेले आहेत.8. एका शिलालेखावर जनार्दन, रुद्र आणि उमेश्वर लिहिलेले आहे. तर आणखी एका शिलालेखावर 'महामुक्ति मंडप', असे लिहिलेले आहे.9. मशिदीच्या अनेक भागांत मंदिराचे स्ट्रक्चर सापडले आहे. 10. मशिदितील आणखी एका शिलालेखावर लिहिलेली वेळ पुसण्याचाही प्रयत्न करण्यात आला आहे.
पूजेचा अधिकार मिळावा हिंदू पक्षाची मागणी - हिंदू पक्षाचे वकील विष्णू शंकर जैन यांनी म्हटले आहे की, 839 पानांच्या या अहवालात, एएसआयने वझूखाना वगळता प्रत्येक काना-कोपऱ्याचा तपशील लिहिला आहे. या अहवालावरून मंदिर तोडून मशीद बांधण्यात आली होती, हे स्पष्ट होते. यामुळे आता तेथे हिंदूंना पूजा-अर्चा करण्याची परवानगी मिळावी. एवढेच नाही, तर मशीद परिसरातील वझूखान्यात सापडलेल्या शिवलिंगासारख्या आकृतीचेही एएसआय सर्वेक्षण झाल्यानंतर, स्पष्ट होईल की, संबंधित शिवलिंगच आहे. तसेच याशिवाय इतरही काही पुरावे मिळतील जे हुंदू पक्षाचा दावा आणखी बळकट करतील, असेही जैन यांनी म्हटले आहे.