अलाहाबाद : वादग्रस्त वक्तव्यांमुळे चर्चेत आलेल्या ‘आदिपुरुष’ चित्रपटावरून अलाहाबाद उच्च न्यायालयाने निर्मात्यांवर ताशेरे ओढले. ‘प्रत्येक वेळी हिंदूंच्या सहनशीलतेची परीक्षा का घेतली जाते? सुदैवाने त्यांनी कायदा-सुवस्थेचा प्रश्न निर्माण केला नाही,’ अशी टिप्पणीही न्यायालयाने यावेळी केली.न्यायमूर्ती राजेश सिंह चौहान आणि श्रीप्रकाश सिंह यांच्या खंडपीठाने म्हटले की, रामायण हा धार्मिक अस्थेचा विषय आहे. खरेतर चित्रपटात धर्मग्रथांबाबत विडंबन टाळायला हवे. धार्मिक भावना दुखावल्यास कायदा-सुव्यवस्थेचा प्रश्न उपस्थित होऊ शकतो. अशा चित्रपटातून त्यांच्या सहनशीलतेची परीक्षा पाहू नका, असेही खंडपीठाने म्हटले.
लोकांना मूर्ख समजता का? - चित्रपटात विविध धार्मिक पात्रांना अशा पद्धतीने मांडण्यात आले, जसे की त्यांचे काही महत्त्वच नाही. चित्रपटाच्या सुरुवातीला ही कलाकृती रामायणावर आधारित नसल्याचे डिस्क्लेमर दाखवण्यात आले. -तुम्ही चित्रपटात राम, लक्ष्मण, सीता, हनुमान, रावण, लंका दाखवता आणि ते रामायण नसल्याचे कसे म्हणता? लोकांना मूर्ख समजता का, असा सवालही खंडपीठाने निर्मात्यांना विचारला.