उत्तर प्रदेशातील लखनऊ येथे फाळणीच्या स्मृती दिना निमित्ताने आयोजित करण्यात आलेल्या एका कार्यक्रमात मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांनी पाकिस्तानच्या भविष्यासंदर्भात मोठी भविष्यवाणी केली आहे. भविष्यात पाकिस्तान भारतात विलीन होईल, असे त्यांनी संकेतिकपणे म्हटले आहे. मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ पाकिस्तानसंदर्भात दावा करताना म्हणाले की, एक तर पाकिस्तानचे विलिनिकरण होईल अथवा तो नष्ट होईल.
जेव्हा-जेव्हा काँग्रेसला संधी मिळाली... -मुख्यमंत्री म्हणाले, फाळणीच्या शोकांतिकेसाठी काँग्रेस कधीही माफी मागणार नाही. जेव्हा-जेव्हा काँग्रेसला संधी मिळाली, तेव्हा तेव्हा त्यांनी देशाचा गळा घोटला आहे. त्यांना कधीही क्षमा केली जाऊ शकत नाही. बांगलादेशात 1947 मध्ये 22% हिंदू होते. आज 7% उरले आहेत. त्या सर्व हिंदूंसोबत आमची सहानुभूती असायला हवी. अखंड भारताचे स्वपच अशा प्रकारच्या घटनांचे समाधान असेल.
काँग्रेसच्या सत्तेच्या लालसेने भारताला बर्बाद केले -मुख्यमंत्री योगी म्हणाले, जर 1947 मध्ये भारतातील राजकीय नेतृत्वात प्रबळ इच्छाशक्ती असती, तर जगातील कुठलीही शक्ती देशाची अनैसर्गिक फाळणी करू शकली नसती. मात्र काँग्रेसच्या सत्तेच्या लालसेने भारताला बर्बाद केले. यांच्याकडे जेव्हा जेव्हा सत्ता गेली, तेव्हा तेव्हा त्यानी देशाचे मोल लावून राजकारण केले.
आज जगात कुठेही संकट आले, तरी... -"1947 ला पंडित नेहरू आणि काँग्रेस पक्ष तिरंगा फडकावत आनंदोत्सव साजरा करत होते, तेव्हा असंख्य लोकांना मातृभूमी सोडावी लागली होती. गेल्या 10 वर्षात भारताची प्रगती जगाला चकित करणारी आहे. यामुळेच आज जगात कुठेही संकट आले, तर जग भारताकडे मोठ्या आशेने बघते," असेही योगी म्हणाले.