ललित झांबरे, लोकमत न्यूज नेटवर्क, वाराणसी (उत्तर प्रदेश): एरवी भाविक आणि पर्यटकांची गजबज राहणाऱ्या काशी (वाराणसी) येथे सध्या राजकीय धुरंधरांची गजबज आहे कारण पंतप्रधान नरेंद्र मोंदींच्या या मतदारसंघात शेवटच्या टप्प्यात १ जून रोजी मतदान होणार आहे. पंतप्रधानांसमोर काँग्रेसचे अजय राय आणि बसपाचे अथर जमाल लारी यांच्यासह सहा उमेदवार आहेत. निकाल मतदार ठरविणार असले तरी पंतप्रधान मोदी येथून हॅट् ट्रिक साजरी करतील हे निश्चित मानले जात आहे फक्त मताधिक्क्य किती असेल, ते वाढेल की घटले हाच प्रश्न आहे.
गेल्या दोन्ही वेळा मोदींचे विजयाचे अंतर वाढलेले आहे. २०१९ मध्ये ते ४,७९,५०५ मतांनी निवडून आले होते. २०१४ पेक्षा हे मताधिक्क्य एक लाखांहूनही अधिक होते. आता ते अंतर पाच लाखांच्यावर राहिल का, याचीच उत्सुकता आहे.
निवडणुकीतील कळीचे मुद्दे
- आपल्या देशभराच्या प्रचार कार्यक्रमातही मोंदींनी आपल्या मतदारसंघाला वेळ देता येईल असे नियोजन केलेले आहे. ते मतदारांशी संपर्क साधत आहेत.
- आपल्या सर्वांच्या प्रेमाने मला बनारसी बनवले आहे. मी इथला केवळ खासदारच नाही तर स्वत:ला काशीचाच पुत्र मानतो असा भावनिक मुद्दा त्यांनी मांडला आहे.
- या मतदारसंघात तब्बल ३३ इच्छुक उमेदवारांचे अर्ज छाननीत बाद ठरविण्यात आल्यानंतर आठ उमेदवारांनी यात काहीतरी गडबड असल्याचा आरोप केला होता.
२०१९ मध्ये काय घडले?
नरेंद्र मोदी - भाजप (विजयी) - ६,७४,६६४ मते विरूद्ध शालिनी यादव - सपा (पराभूत) - १,९५,१५९ मते