Bahraich Violence News:उत्तर प्रदेशातील बहराइचमध्ये झालेल्या हिंसाचारप्रकरणी अटक करण्यात आलेल्या पाच आरोपींना 14 दिवसांची न्यायालयीन कोठडी सुनावण्यात आली आहे. दरम्यान, प्रशासन आता कडक कारवाईच्या मूडमद्ये असून, सार्वजनिक बांधकाम विभागाने महाराजगंज परिसरात बेकायदेशीरपणे बांधलेल्या घरे आणि दुकानांवर नोटिसा चिकटवल्या आहेत. यामध्ये राम गोपाल हत्याकांडातील मुख्य आरोपी अब्दुलच्या घराचाही समावेश आहे.
सार्वजनिक बांधकाम विभागाने नोटीसमध्ये दुकान आणि घरमालकांकडून उत्तरे मागितली आहेत. बांधकाम करण्यापूर्वी जिल्हाधिकाऱ्यांची परवानगी न घेतल्यास कारवाई केली जाईल, असे विभागाने म्हटले. महसी महाराजगंजमधील डझनभर घरे आणि दुकानांची ओळख पटली असून त्यावर नोटिसा चिकटवण्यात आल्या आहेत.
बहराइच सार्वजनिक बांधकाम विभागाने आरोपी अब्दुल हमीदच्या घरावर चिकटवलेल्या नोटीसमध्ये कुंदसर महसी नानपारा मुख्य जिल्हा मार्गावरील महाराजगंजच्या काठावर बेकायदेशीर बांधकामाचा उल्लेख करण्यात आला आहे. कुंदसर महसी नानपारा रस्ता हा प्रमुख जिल्हा मार्ग श्रेणीतील रस्ता आहे. विभागीय मानकांनुसार, प्रमुख जिल्हा मार्गावरील ग्रामीण भागातील रस्त्याच्या मध्यभागापासून 60 फूट अंतरावर विभागीय परवानगीशिवाय केलेले कोणतेही बांधकाम बेकायदेशीर बांधकामाच्या श्रेणीत येते.
सार्वजनिक बांधकाम विभागाची नोटीस नोटीसमध्ये म्हटले आहे की, तुम्हाला नोटीसद्वारे कळविण्यात येते की, तुम्ही जर हे बांधकाम जिल्हादंडाधिकारी, बहराइच यांच्या परवानगीने केले असेल, तर त्याची मूळ प्रत तात्काळ उपलब्ध करून द्यावी अन्यथा अवैध बांधकाम स्वतः काढून घ्यावे. मुदत संपल्यानंतर पोलीस व प्रशासनाच्या मदतीने बेकायदा बांधकाम हटविण्याची कारवाई करण्यात येईल व कारवाईत झालेला खर्च तुमच्याकडून वसूल केला जाईल.
आतापर्यंत 60 जणांना अटक बहराइचमधील हिंसाचारप्रकरणी अटक करण्यात आलेले पाच आरोपी सरफराज, मोहम्मद तालीम, अब्दुल हमीद, फहीम आणि मोहम्मद अफजल यांना शुक्रवारी मुख्य न्यायदंडाधिकारी प्रतिभा चौधरी यांच्या न्यायालयात हजर करण्यात आले. न्यायालयाने या आरोपींना 14 दिवसांची न्यायालयीन कोठडी सुनावली. बहराइच हिंसाचार प्रकरणी पोलिसांनी आतापर्यंत 60 जणांना अटक केली आहे.