भरधाव कारने धडक देत चिरडल्याने झालेल्या अपघातात लखनौच्या अॅडिशनल एसपी श्वेता श्रीवास्तव यांच्या मुलाचा मृत्यू झाला होता. या अपघातानंतर कारचालक घटनास्थळावरून फरार झाला होता. या प्रकरणी पोलिसांनी तपास करत पोलिसांनी सार्थक सिंह आणि देवश्री वर्मा यांना अटक केली होती. दोघांवरही सदोष मनुष्यवधाचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. आता पोलीस सार्थक आणि देवश्री यांची कोठडी घेणार आहेत.
आज सकाळी लखनौच्या अॅडिशनल एसपी श्वेता श्रीवास्तव यांचा मुलाचा रस्ते अपघातात मृत्यू झाला होता. तो सकाळी घरातून स्केटिंग करण्यासाठी बाहेर पडला होता. परतत असताना जनेश्वर मिश्रा पार्कसमोर एका भरधाव कारने त्याला धडक दिली होती. जखमी अवस्थेत त्याला रुग्णालयात दाखल करण्यात आले. मात्र तिथेच त्याचा मृत्यू झाला. या घटनेनंतर पोलिसांनी आरोपींचा शोध सुरू केला होता.
तसेच सार्थक सिंह आणि देवश्री वर्मा या दोन तरुणांना पोलिसांनी अटक केली. सार्थक एमिटी युनिव्हर्सिटीमध्ये बीबीएचा विद्यार्थी आहे. तर देवश्री वर्मा इंजिनियरिंगचा विद्यार्थी आहे. पोलिसांनी त्यांच्याकडून यूपी ३२, एनटी ६६६९ पांढऱ्या रंगाची एसयूव्ही कार जप्त केली आहे. पोलिसांनी सांगितले की, ही एसयूव्ही कानपूर येथील ज्वेलर अंशुल वर्मा यांच्या नावावर आहे. अंशुल हे देवश्री याचे काका आहेत.
पोलिसांनी सांगितले की, जी २० रोडवर दोन्ही आरोपी एसयूव्हीची शर्यत लावत असताना हा अपघात झाला. परिसरात लावलेल्या सीसीटीव्ही फुटेजच्या माध्यमातून एसयूव्ही आणि आरोपींची ओळख पटवण्यात आली. आरोपी सार्थक सिंह याचे वडील रवींद्र सिंह उर्फ पप्पू हे बाराबंकी रामनगर येथील जिल्हा पंचायत सदस्य राहिलेले आहेत.