उत्तर प्रदेशमधील बरेली येथे योगी आदित्यनाथ यांचा वेगळाच अंदाज पाहायला मिळाला. योगी आदित्यनाथ हे येथे डोरी लाल स्पोर्ट्स स्टेडियममधील मल्टिपर्पज हॉलचं उद्घाटन करण्यासाठी आले होते. यादरम्यान, मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ हे बॅडमिंटन कोर्टामध्ये पोहोचले. तिथे त्यांनी उत्तर प्रदेशच्या वित्तमंत्र्यांना खेळायला बोलावले. त्यानंतर मुख्यमंत्री आणि वित्तमंत्री काही काळ बॅडमिंटनच्या कोर्टवर खेळाचा आनंद घेतला.
एकीकडे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांच्या हातात रॅकेट होतं. तर दुसरीकडे वित्तमंत्री सुरेश खन्ना हेही सज्ज होऊन खेळत होते. भगवी कफनी घालून खेळत असलेल्या योगी यांना खेळताना पाहून सारेच अवाक् झाले होते. तसेच मुख्यमंत्री स्वत: खेळात हात आजमावत असताना तिथे खेळाडू, नेतेमंडळी आणि सुरक्षा अधिकारी आदी उपस्थित होते. या उद्घाटन सोहळ्यावेळी मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांनी स्टेडियममध्ये उपस्थित असलेले खेळाडू प्रशिक्षक आदींची भेट घेऊन त्यांच्याशी संवाद साधला. तसेच स्टेडियममध्ये खेळांसाठी उपलब्ध करून दिलेल्या सोईसुविधांचंही निरीक्षण केलं.
डोरी लाल स्पोर्ट्स स्टेडियममध्ये बनवण्यात आलेल्या आधुनिक हॉलमध्ये १० कोटी ८ लाख रुपये खर्च करण्यात आले आहेत. हा संपूर्ण हॉल एअर कंडिशन आहे. यामध्ये दोन बाल्कनी बनवण्यात आल्या आहेत. तसेच या हॉलमध्ये एकाचवेळी ३५० लोकांच्या राहण्याची सुविधा आहे. तसेच खेळाडूंना थांबण्यासाठी विश्रामगृह, ट्रेकिंग रूम, मेडिकल रूम यासह लिफ्ट आदींची सुविधाही उपलब्ध करून देण्यात आली आहे. या हॉलमध्ये कुस्ती, टेबल टेनिस, कबड्डी, बॅडमिंटन आदी खेळ खेळण्याची सुविधा उपलब्ध करून देण्यात आलेली आहे.