Yogi Adityanath vs Mamta Banerjee: उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांनी सोमवारी बंगालच्या ममता सरकारवर जोरदार निशाणा साधला. यूपीमध्ये नगरपालिका निवडणुका, पंचायत निवडणुका आणि विधानसभा निवडणुका कशा पार पडल्या हे तुम्ही पाहिले असेलच. पण तेच पश्चिम बंगालमध्ये झालेल्या पंचायत निवडणुकांमध्ये बघा काय झालं?, असा खोचक सवाल त्यांनी केला. यासोबतच, त्यांनी ममता सरकारच्या कार्यपद्धतीवर टीका केली. मी गेल्या साडेसहा वर्षांपासून उत्तर प्रदेशचा मुख्यमंत्री आहे, पण 2017 मध्ये भाजप सरकार सत्तेत आल्यापासून येथे एकही दंगल झाली नाही. काही लोकांना अशा प्रकारे देशात सत्तेत येऊन संपूर्ण व्यवस्थाच जबरदस्तीने तुरुंगात टाकायची आहे, असाही टोला त्यांनी दिला.
'विरोधी पक्षाच्या कार्यकर्त्यांची हत्या झाली'
बंगालच्या पंचायत निवडणुकीतील हिंसाचारावर कोणीही बोलायला तयार नाही. विरोधी पक्षांचे कार्यकर्ते मारले गेले. जे लोक लोकशाहीची हत्या करत आहेत, तेच लोकशाहीच्या गप्पा मारत आहेत. बंगालमधील हिंसाचारासारख्या घटना या लोकांचे डोळे उघडणाऱ्या आहेत, असे ममता बॅनर्जींवर हल्लाबोल करताना योगी आदित्यनाथ म्हणाले. तसेच यूपीच्या मुख्यमंत्र्यांनी जुन्या सरकारांचाही समाचार घेतला आणि ते म्हणाले की, 2017 पूर्वी यूपीमध्ये शांततेत निवडणुका घेणे हे स्वप्नापेक्षा कमी नव्हते.
'ज्ञानवापींना मशीद म्हणणे चुकीचे आहे'
एएनआय या वृत्तसंस्थेशी बोलताना मुख्यमंत्री योगी यांनी ज्ञानवापीच्या मुद्द्यावर सडेतोड प्रतिक्रिया दिली. यावर तोडगा काढण्याचे प्रयत्न सुरू असल्याचे त्यांनी सांगितले. मुख्यमंत्री म्हणाले की, ज्ञानवापीमध्ये देवतांच्या मूर्ती आहेत, हिंदूंनी त्या ठेवलेल्या नाहीत. ज्ञानवापी मस्जिद म्हटले तर वाद होईल. मुस्लिम समाजाकडून ऐतिहासिक चूक झाली असून ती सोडवण्यासाठी मुस्लिम समाजानेच पुढे आले पाहिजे. जर ज्ञानवापी मशीद आहे तर त्यात त्रिशूल का आहे, असा सवालही सीएम योगींनी केला.