वाराणसी - उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांच्या नेतृत्त्वात प्रथमच अयोध्येत राज्य मंत्रिमंडळाची बैठक होत आहे. त्यासाठी, अयोध्या नगरी चांगलीच सजविण्यात आली असून श्री राम आणि हनुमान यांची कमान बैठकीच्या ठिकाणी उभारण्यात आली आहे. या बैठकीपूर्वी योगी आदित्यनाथ यांनी मंत्रीमंडळातील सर्वच सदस्यांसह हनुमान गढी येथे जाऊन दर्शन घेतले. तर, अयोध्येतील रामलल्लांचीही पूजा-आरती केली. त्यामुळे, आजच्या बैठकीत नेमके कोणते महत्त्वाचे निर्णय घेतले जाणार, अयोध्येसाठी योगी काय घोषणा करणार याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.
योगी आदित्यनाथ हे आपल्या मंत्रिमंडळासह अयोध्या नगरीत पोहोचले असून त्यांनी सर्वप्रथम हनुमान गढी येथे जाऊन दर्शन घेतले. त्यानंतर, येथील प्रभू श्रीराम जन्मभूमी स्थळावर जाऊन रामलल्लाचेही दर्शन घेतले. त्यानंतर, आज सर्वच सदस्यांसह येथे मंत्रिमंडळाची बैठक होत असून या बैठकीत मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ काय घोषणा करतील, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. ११ नोव्हेंबर रोजी येथे मोठा दिपोत्सव होणार आहे. त्याच्या एक दिवस अगोदरच येथे बैठकीचं आयोजन केलं आहे. विशेष म्हणजे उत्तर प्रदेश सरकारचं मंत्रालय आणि विधानभव लखनौमध्ये आहे. तरीही, यंदा प्रथमच अयोध्येत मंत्रिमंडळ बैठकीचं आयोजन करण्यात आलंय.
योगी आदित्यनाथ यांच्या नेतृत्वात येथील आंतरराष्ट्रीय रामकथा संग्रहालयात ४ तास बैठक होणार आहे. उत्तर प्रदेश सरकारच्या मंत्रिमंडळाचा विस्तारही लवकरच होणार आहे. त्या पार्श्वभूमीवर या बैठकीकडे अनेकांच्या नजरा लागल्या आहेत. तसेच, या बैठकीत अयोध्या तीर्थ विकास परिषद, देवीपाटन धाम तीर्थ विकास परिषद आणि मुजफ्फरनगर येथील शुक्रताल धाम तीर्थ विकास परिषदेच्या स्थापनेला मंजुरी मिळण्याची शक्यता आहे. यासह, अयोध्या आणि पुढील २ महिन्यात होत असलेल्या राम मंदिरा लोकार्पणाच्या पार्श्वभूमीवर आणखी काही महत्त्वाच्या घोषणा केल्या जाऊ शकतात.