यंदाच्या लोकसभा निवडणुकीत भाजपालाउत्तर प्रदेशमध्ये दारुण पराभवाचा सामना करावा लागला होता. त्यात रामजन्मभूमी असलेल्या अयोध्येचा समावेश असलेल्या फैजाबाद लोकसभा मतदारसंघामध्येही भाजपाला पराभूत व्हावे लागले होते. अयोध्येत भाजपाच्या झालेल्या या पराभवामुळे विरोधकांच्या हाती मोठा मुद्दा लागला आहे. तर हा पराभव राम मंदिर आंलोदनात महत्त्वाची भूमिका बजावणाऱ्या भाजपाच्या जिव्हारी लागला होता. त्यामुळे आता या पराभवाचा वचपा काढण्याची संधी भाजपा शोधत असून, फैजाबाद लोकसभा मतदारसंघातील मिल्कीपूर विधानसभा मतदारसंघात होणाऱ्या पोटनिवडणुकीत विजय मिळवून अयोध्येतील पराभवाची भरपाई करण्याचा त्यांचा प्रयत्न आहे. त्यामुळे उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांनीही मिल्कीपूरमध्ये होणाऱ्या पोटनिवडणुकीसाठी कंबर कसली असून, येथे विजय मिळवण्यासाठी खास रणनीती आखली आहे.
लोकसभा निवडणुकीत फैजाबाद लोकसभा मतदारसंघात झालेल्या निवडणुकीत भाजपाच्या ललन सिंह यांचा पराभव करून समाजवादी पार्टीचे अवधेश प्रसाद हे विजयी झाले होते. तत्पूर्वी अवधेश प्रसाद हे मिल्कीपूर विधानसभा मतदारसंघातील आमदार होते. लोकसभा निवडणुकीतील विजयानंतर त्यांनी विधानसभा सदस्यत्वाचा राजीनामा दिला आहे. त्यामुळे रिक्त झालेल्या मिल्कीपूर विधानसभा मतदारसंघातील जागेवर लवकरच पोटनिवडणूक होणार आहे.
उत्तर प्रदेश विधानसभेच्या दहा जागांसाठी होणाऱ्या पोटनिवडणुकीच्या तयारीसाठी भाजपाकडून बैठकांवर बैठका घेण्यास सुरुवात केली आहे. त्यात मिल्कीपूर विधानसभा मतदारसंघावर विशेष लक्ष केंद्रित करण्यात आलं आहे. राज्य सरकारमधील चार मंत्री अयोध्येत दाखल झाले आहेत. कृषिमंत्री सूर्य प्रताप शाही, संसदीय कार्यमंत्री मयंकेश्वर शरण सिंह, अन्न आणि पुरवठा मंत्री सतीष शर्मा आणि क्रीडामंत्री गिरीश यादव अयोध्येत दाखल झाले आहेत. माजी खासदार लल्लू सिंह यांच्याशी चारही मंत्र्यांनी चर्चा केली आहे.
दरम्यान, कृषिमंत्री सूर्यप्रताप शाही यांनी सांगितलं की, अयोध्येमध्ये झालेला पराभव दु:खद आहे. तसेच त्यामुळे भाजपाला धक्का बसला आहे. आमच्यामध्ये ज्या त्रुटी राहिल्या होत्या, त्या दुरुस्त करण्याचा प्रयत्न करत आहोत. विरोधी पक्षांनी जनतेची दिशाभूल केली. घटना बदलली जाईल, अशी अफवा पसरवली. मात्र खरंतर काँग्रेसने १९७५ मध्ये आणीबाणी लावली होती. आमच्या कुटुंबातील तीन सदस्य तुरुंगात गेले होते. हा देश काँग्रेसला कधी माफ करणार नाही, असा टोलाही सूर्य प्रताप शाही यांनी लगावला.