वीटभट्टीवरील कच्ची भिंत कोसळून ६ कामगारांचा मृत्यू, ७ जखमी
By ऑनलाइन लोकमत | Published: December 26, 2023 02:14 PM2023-12-26T14:14:15+5:302023-12-26T14:45:23+5:30
अपघातातील जखमींना तात्काळ जवळील रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे
उत्तराखंडच्या रुडकी येथील भीषण अपघाताची घटना घडली आहे. मंगलौर तालुक्यातील लहबोली गावात वीटभट्टीवरील कच्चे बांधकाम असलेली भिंत कोसळून ६ कामगारांचामृत्यू झाला. सकाळी सकाळी वीटभट्टीवर कामासाठी आलेल्या मजुरांच्या अंगावर ही भिंत कोसळल्याने अपघात झाला. त्यामध्ये, भिंतीच्या ढिगाऱ्याखाली दबून ६ कामगारांचा मृत्यू झाला असून ७ जण गंभीर जखमी झाले आहेत.
अपघातातील जखमींना तात्काळ जवळील रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. घटनेची माहिती मिळताच लक्सर येथील आमदार मोहम्मद शहजाद, पोलीस अधीक्षक यांच्यासह अधिकारी घटनास्थळी दाखल झाले असून मदतकार्य सुरू करण्यात आले. लहबोली गावात विटभट्टी कारखानदारी आहे. येथे जवळपास १०० पेक्षा अधिक कामगार काम करतात. यावेळी, कच्च्या विटांची भट्टीत भरणी करण्याचं काम सुरू होतं. त्याचवेळी, भिंत कोसळून दुर्घटना घडली.
या कोसळलेल्या भिंतीच्या ढिगाऱ्याखाली तेथील ८ ते १० कामगार दबले. या घटनेनंतर स्थानिकांनी तात्काळ घटनास्थळी धाव घेतली. तर, आजुबाजूच्या परिसरातील कामगारही मदतीसाठी धावले. जेसीबी आणि हातांनी विटांना बाजूला सारुन दबलेल्या कामगारांना बाहेर काढण्याचा प्रयत्न करण्यात आला. मात्र, दुर्घटनेत ६ कामगारांना आपला जीव गमवावा लागला.
या दुर्घटनेत मुकुल, साबिर, अंकित, बाबूराम आणि जग्गी यांचे जागेवरच मृत्यू झाला. तसेच, आशु, समीरसह ५ जण जखमी झाले आहेत. घटनेची माहिती मिळताच आमदार मोहम्मद शहजाद, एसपी एस.के सिंह, एसडीएम विजयनाथ शुक्लांसह अधिकारी घटनास्थळी पोहोचले.