उत्तराखंडमधील जागृत देवस्थान असलेल्या केदारनाथ मंदिराजवळ आज एक मोठा हेलिकॉप्टर अपघात टळला. केदारनाथ धाम येथे एक हेलिकॉप्टर आणीबाणीच्या परिस्थितीत हेलिपॅडपासून सुमारे १०० मीटर खाली उतरवावे लागले. या हेलिकॉप्टरमधून काही प्रवासी प्रवास करत होते. दरम्यान, आता या घटनेचा व्हिडिओ सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहे.
शुक्रवारी सकाळी हे हेलिकॉप्टर केदारनाथ धाम हेलिपॅड पासून १०० मीटर आधी उतरवावे लागले. या घटनेचं सीसीटीव्ही फुटेज समोर आलं आहे. त्यामध्ये हे हेलिकॉप्टर हेलिपॅडवर उतरण्याचा प्रयत्न करताना दिसत आहे. मात्र काही तांत्रिक बिघाडामुळे या हेलिकॉप्टरला योग्य ठिकाणी उतरता येत नाही. तसेच हे हेलिकॉप्टर भरकटून हवेत गोल गोल फिरताना दिसते. सुदैवाने पायलट या हेलिकॉप्टरवर नियंत्रण मिळवण्यात यश मिळवतो आणि हे हेलिकॉप्टर हेलिपॅड पासून सुमारे १०० मीटर खाली यशस्वीपणे उतरवतो.
या हेलिकॉप्टरमधून पायलटसह सहा प्रवासी प्रवास करत होते. या प्रवाशांना घेऊन हे हेलिकॉप्टर सिरही हेलिपॅड येथून केदारनाथ धाम हेलिपॅड येथे येत होते. या प्रवासादरम्यान काही तांत्रिक बिघाडामुळे हेलिकॉप्टरला हेलिपॅडवर उतरता आले नाही. अखेरीस या हेलिकॉप्टरला हेलिपॅड पासून सुमारे १०० मीटर अंतरावर खाली उतरावे लागले. सुदैवाने या दुर्घटनेत कुठलीही हानी झाली नाही. तरीही घटनेचं गांभीर्य लक्षात घेऊन जिल्हाधिकारी डॉ. सौरभ गहरवार यांनी घटनेच्या चौकशीचे आदेश दिले आहेत. सद्यस्थितीत केदारनाथ धाम येथे नऊ हेलिकॉप्टर सेवा सुरू आहेत.