मुंबई – उत्तराखंडमध्येगुंतवणूक करण्यासाठी इच्छुक असलेल्या उद्योजकांशी सोमवारी उत्तराखंड सरकारने मुंबईत चर्चा केली. मुंबईत झालेल्या या कार्यक्रमात विविध कंपन्यांसोबत जवळपास ३० हजार २०० कोटींचे सामंजस्य करार करण्यात आले. त्यात इमॅजिका (थीम पार्क), आत्मांतन (रिसॉर्ट), ACME (सोलर सेल मॅन्युफॅक्चरिंग), CTRLs (डेटा सेंटर), CleanMax Enviro, Perfect, सायनस, लोसुंग अमेरिका (IT), क्रोमा एटर या काही प्रमुख कंपन्यांसोबत सामंजस्य करार करण्यात आले आहेत.
यासह इतर काही महत्त्वाच्या कंपन्यांशी उत्तराखंड सरकारने चर्चा झाली, त्यापैकी प्रमुख जेएसडब्ल्यू स्पोर्ट्स, गोदरेज केमिकल्स, एस्टार भोजन, व्ही अर्जुन लॉजिस्टिक पार्क यांचा समावेश आहे. उत्तराखंडचे मुख्यमंत्री पुष्कर सिंह धामी यांच्या नेतृत्वाखाली आतापर्यंत देशाबाहेर लंडन, बर्मिंगहॅम, अबुधाबी, दुबई येथे ४ आंतरराष्ट्रीय रोड शो आयोजित करण्यात आले होते. तर देशात राज्य सरकारने दिल्ली, चेन्नई, बेंगळुरू, अहमदाबाद आणि आता मुंबई येथे रोड शो केले. १४ सप्टेंबर आणि ४ ऑक्टोबर रोजी धामी सरकारने दिल्लीमध्ये २६५७५ कोटी, २६ आणि २७ सप्टेंबर रोजी ब्रिटनमध्ये १२५०० कोटी, १७ आणि १८ ऑक्टोबर रोजी यूएईमध्ये १५४७५ कोटी रुपयांच्या गुंतवणुकीचा करार केला आहे. याशिवाय २६ ऑक्टोबर रोजी चेन्नईमध्ये १०१५० कोटी, बेंगळुरूमध्ये २८ ऑक्टोबरला ४६०० कोटी आणि अहमदाबादमध्ये १ नोव्हेंबरला २४००० कोटी रुपयांचे गुंतवणूक करार सरकारकडून करण्यात आले आहेत. आता मुंबई रोड शोमध्ये ३०२०० कोटी रुपयांचे सामंजस्य करार करण्यात आले आहेत.
आतापर्यंत राज्य सरकारने ज्या गुंतवणूकदारांसोबत गुंतवणुकीचे सामंजस्य करार केले आहेत त्यात प्रामुख्याने पर्यटन हॉस्पिटॅलिटी, आयुष वेलनेस, उत्पादन, फार्मा, अन्न प्रक्रिया, रिअल इस्टेट-इन्फ्रा, पंप स्टोरेज, ग्रीन एँन्ड रिन्यूबल एनर्जी आणि ऑटोमोबाईल या विविध सेक्टरचा समावेश आहे. आज मुख्यमंत्री पुष्कर सिंह धामी मुंबईत ग्लोबल इन्व्हेस्टर समिटसाठी आयोजित रोड शोमध्ये सहभागी झाले होते. यावेळी मुख्यमंत्र्यांनी देशातील प्रमुख औद्योगिक समूहांशी बैठक घेऊन उत्तराखंडमधील गुंतवणुकीच्या शक्यतांवर चर्चा केली. मुख्यमंत्री धामी यांनी ८-९ डिसेंबर रोजी होणाऱ्या ग्लोबल इन्व्हेस्टमेंट समिटसाठी सर्व गुंतवणूकदारांना आमंत्रित केले.
मुख्यमंत्री पुष्कर सिंह धामी म्हणाले की, मुंबई ही देशाची आर्थिक राजधानीच नव्हे तर भारताच्या विकासाच्या अनोख्या गाथेचा एक प्रमुख भाग आहे. मुंबई ही देशाची आर्थिक राजधानी आहे, तर उत्तराखंड ही देशाची आध्यात्मिक राजधानी आहे, त्यामुळे या दोघांमधील परस्पर समन्वय आणि भागीदारी खूप महत्त्वाची आहे. महाराष्ट्र विशेषत: मुंबई आणि उत्तराखंड एकमेकांना पूरक आहेत. कोणत्याही राष्ट्राच्या विकासासाठी आधुनिक तंत्रज्ञान आणि व्यवस्थापकीय कौशल्ये आवश्यक असली तरी आध्यात्मिक सामर्थ्य आणि शांतताही खूप महत्त्वाची आहे. उत्तराखंडने पुढील ५ वर्षांत राज्याचा जीएसडीपी दुप्पट करण्याचे उद्दिष्ट ठेवले आहे, त्यासाठी सशक्त उत्तराखंड अभियान सुरू करण्यात आले आहे. ८-९ डिसेंबर रोजी होणारा उत्तराखंड ग्लोबल इन्व्हेस्टर्स समिट-२०२३ हा देखील या मिशनचा विशेष भाग आहे असंही त्यांनी गुंतवणूकदारांना सांगितले.
तसेच उत्तराखंडमध्ये औद्योगिक क्षेत्रात गुंतवणूक वाढली तर रोजगाराच्या संधींमध्ये होणारी वाढ शाश्वत असेल. आतापर्यंत झालेल्या रोड शोच्या माध्यमातून १ लाख कोटींहून अधिक गुंतवणुकीचे प्रस्ताव राज्य सरकारला मिळाले आहेत. यावरून देशातीलच नव्हे, तर परदेशातील उद्योजकही उत्तराखंडमध्ये गुंतवणूक करण्यास उत्सुक आहेत हे सिद्ध होते. २०१५ मध्ये पंतप्रधान नरेंद्र मोदींनी प्रभावी प्रशासनासोबत सुलभीकरण, संकल्प, तोडगा आणि समाधान हे सूत्र स्वीकारून ईज ऑफ ड्युईंग बिझनेसच्या क्षेत्रात अभूतपूर्व यश मिळवले. आमचे सरकारचाही तेच आत्मसात करण्याचा प्रयत्न आहे असंही मुख्यमंत्री पुष्कर सिंह धामी यांनी म्हटलं.
दरम्यान, राज्यात परवाने आणि परवानग्या यासाठी सिंगल विंडो सिस्टीम तयार केली आहे. त्यातून उद्योगासाठी लागणाऱ्या सर्व आवश्यक परवानग्या एकखिडकी योजनेतून देण्याची सुविधा सरकारने केली आहे. उद्योजकांना उत्तराखंडमध्ये उद्योग उभारण्यात कोणतीही अडचण येणार नाही. सशक्त धोरणात्मक चौकटीत गुंतवणूकदार यांच्या हिताची धोरणे तयार करण्यासाठी सरकारने अनेक नवीन पाऊले उचलली आहेत. अनेक योजना आखल्या आहेत असंही मुख्यमंत्री धामी यांनी सांगितले. यावेळी मुख्य सचिव डॉ.एस.एस.संधू, सचिव डॉ.आर.मीनाक्षी सुंदरम, सचिव उद्योग विनय पांडे, उद्योग महासंचालक रोहित मीना, महासंचालक बंशीधर तिवारी आणि विविध उद्योग समूहांचे प्रतिनिधी उपस्थित होते.