माना हिमस्खलनात पाच कामगारांचा मृत्यू; बेपत्ता आणखी एका कामगाराचा मृतदेह सापडला

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 3, 2025 09:27 IST2025-03-03T09:27:36+5:302025-03-03T09:27:49+5:30

शुक्रवारी झालेल्या अपघातानंतर घटनास्थळावरून ५० कामगारांना वाचवण्यात आले आहे.

five workers die in mana avalanche | माना हिमस्खलनात पाच कामगारांचा मृत्यू; बेपत्ता आणखी एका कामगाराचा मृतदेह सापडला

माना हिमस्खलनात पाच कामगारांचा मृत्यू; बेपत्ता आणखी एका कामगाराचा मृतदेह सापडला

देहरादून : उत्तराखंडमधील चमोली जिल्ह्यातील बद्रीनाथजवळील माना गावात सीमा रस्ते संघटना (बीआरओ) कॅम्पमध्ये हिमस्खलनात गाडलेल्या एका मजुराचा मृतदेह रविवारी सापडला. त्यामुळे मृतांची संख्या पाच झाली आहे. बेपत्ता असलेल्या तीन कामगारांना शोधण्यासाठी स्निफर डॉग आणि हेलिकॉप्टरच्या मदतीने बचावकार्य सुरूच आहे. शुक्रवारी झालेल्या अपघातानंतर घटनास्थळावरून ५० कामगारांना वाचवण्यात आले आहे.

ज्योतिर्मठ येथील आर्मी हॉस्पिटलमधील डॉक्टरांनी सांगितले की, ४६ कामगारांना उपचारासाठी रुग्णालयात आणण्यात आले होते, त्यापैकी पाठीच्या कण्याला दुखापत झालेल्या एका कामगाराला चांगल्या उपचारांसाठी एअर ॲम्ब्युलन्सद्वारे एम्स ऋषिकेश येथे पाठवण्यात आले. ले. कर्नल डी. एस. मालध्या म्हणाले की, रुग्णालयात दाखल असलेल्या इतर तीन कामगारांची प्रकृतीही गंभीर आहे परंतु त्यांच्यावर उपचार सुरू आहेत.

बचाव मोहिमेला गती 

चमोलीचे जिल्हा दंडाधिकारी डॉ. संदीप तिवारी म्हणाले की, हवामान स्वच्छ आहे आणि ग्राउंड पेनिट्रेटिंग रडार (जीपीआर) प्रणाली देखील दिल्लीहून येणार आहे, त्यामुळे बेपत्ता कामगारांना शोधण्याच्या मोहिमेला गती मिळण्याची शक्यता आहे. शुक्रवारी सुमारे ३,२०० मीटर उंचीवर असलेल्या भारत-चीन सीमेवरील शेवटचे गाव माना येथे हिमस्खलन झाल्यानंतर बीआरओ कॅम्पमध्ये आठ कंटेनरमध्ये राहणारे ५४ बॉर्डर रोड्स ऑर्गनायझेशन (बीआरओ) कामगार बर्फात अडकले होते.

मुख्यमंत्र्यांकडून आढावा 

उत्तराखंडचे मुख्यमंत्री पुष्कर सिंह धामी यांनीही राज्य आपत्कालीन ऑपरेशन सेंटरमध्ये पोहोचून माना येथे सुरू असलेल्या बचाव कार्याचा आढावा घेतला आणि हिमस्खलनामुळे बाधित वीज, दळणवळण आणि इतर सुविधा लवकरात लवकर पूर्ववत करण्याचे निर्देश अधिकाऱ्यांना दिले. 

त्यांनी सांगितले की, अपघातात मृत्युमुखी पडलेल्या कामगारांचे मृतदेह त्यांच्या घरी पाठवले जातील. दळणवळणापासून तुटलेल्या गावांसाठी अन्न आणि इतर आवश्यक वस्तूंची व्यवस्थादेखील केली जात आहे. 

पाच गावांमध्ये वीजपुरवठा खंडित झाला होता जो पूर्ववत केला आहे, तर घटनास्थळाभोवती दळणवळण व्यवस्था पूर्ववत करण्याचे प्रयत्न सुरू आहेत.  

 

Web Title: five workers die in mana avalanche

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.