उत्तराखंडमधील हल्द्वानी येथे गुरुवारी संध्याकाळी झाला हिंसाचार हा पूर्वनियोजित होता, अशी धक्कादायक माहिती समोर आली आहे. काही दिवसांपूर्वीच आजूबाजूच्या घरांच्या छतांवर दगडगोटे ठेवण्यात आले होते. तसेच पोलीस ठाण्यालाही पेटवून देण्याचा प्रयत्न केला. तसेच सुरक्षेसाठी तैनात असलेल्या पोलिसांनाही जमावानं जिवंत जाळण्यासाठी चाल केली होती, अशी धक्कादायक माहिती नैनीतालच्या जिल्हाधिकारी वंदना सिंह यांनी दिली आहे.
त्यांनी सांगितले की, काल अतिक्रमण हटवण्याची कारवाई सुरू होताच जमाव जमायला सुरुवात झाली. पोलीस ठाण्यावर बॉम्ब फेकले गेले. पोलीस ठाण्याबाहेरील वाहनांना आग लावण्यात आली. तिथे उपस्थित पोलीस अधिकाऱ्यांवर हल्ला करण्यात आला. तोपर्यंत सुरक्षा दल शांत होतं. नैनीतालच्या जिल्हाधिकारी पुढे म्हणाल्या की, दंगलखोरांनी आधीपासून तयारी करून ठेवली होती. विनाकारण पोलिसांवर हल्ला केला गेला. पोलीस ठाण्यात असलेल्या पोलिसांना जिवंत जाळण्याचा प्रयत्न झाला. काही काळापूर्वी त्या परिसरातील घऱांचे छत रिकामे होते. मात्र नंतर जेव्हा जाळपोळ सुरू झाली तेव्हा ड्रोन कॅमेऱ्याने टिपलेल्या व्हिडीओमध्ये छत रिकामी नसल्याचे दिसून आले.
जिल्हाधिकाऱ्यांनी सांगितले की, १५-२० दिवसांपासून हल्द्वानी येथे वेगवेगळ्या भागात अतिक्रमणाविरोधात कारवाई सुरू आ हे. सरकारी संपत्तीवरील अवैध कब्जा, अतिक्रमण हटवण्यात येत आहे. तसेच अतिक्रमण करणाऱ्या सर्वांना नोटिस बजावण्यात येत आहे. अशा व्यक्तींना सुनावणीची संधी देण्यात आली आहे. तसेच काही जणांनी कोर्टातही धाव घेतली होती. आता वेळ मिळताच अतिक्रमण विरोधी विभागाने याविरोधात मोहीम सुरू केली आहे. अशी कारवाई एकाच ठिकाणी नाही तर अनेक ठिकाणी करण्यात आली आहे, अशी माहितीही जिल्हाधिकाऱ्यांनी दिली आहे.
जिल्ह्याधिकाऱ्यांनी पुढे सांगितले की, ३० जानेवारी रोजी छतांवर दगड नव्हते. कोर्टात सुनावणी सुरू असताना कारवाई झाल्यास हल्ला करता यावा यासाठी दगडधोंडे जमा केले केले. अशा प्रकारे सरकारी यंत्रणेला कारवाईपासून रोखण्याचा प्रयत्न केला गेला. मात्र अधिकाऱ्यांनी कारवाई सुरूच ठेवली. जमाव सुरुवातीला दगड घेऊन आला. या जमावाला पांगवल्यानंतर दंगलखोरांकडून पेट्रोल बॉम्बचा वापर करण्यात आला. तोपर्यंत पोलिसांनी फारसा प्रतिकार केला नव्हता, असे जिल्हाधिकाऱ्यांनी सांगितले.