उत्तराखंडमधील हरिद्वारमध्ये पोलिसांनी बनावट नोटा छापणाऱ्या एका टोळीचा भांडाफोड केला आहे. पोलिसांनी या प्रकरणी ६ आरोपींना अटक केली आहे. त्यांच्याजवळून सव्वा दोन लाखांच्या बनावट नोटांसह मोठ्या प्रमाणावर साहित्य जप्त करण्यात आलं आहे. पोलिसांनी केलेल्या चौकशीमध्ये आरोपींनी यूट्युबवर बनावट नोटा तयार करण्याचे व्हिडीओ पाहिले आणि काम सुरू केले, असे सांगितले. आरोपी देहराडून येथील सुद्धोवाला आणि डून एनक्लेव, पटेलनगर येथे भाड्याच्या खोलीत राहून बनाावट नोटांचा धंदा चालवत होते.
हरिद्वार पोलिसांकडून मिळालेल्या माहितीनुसार सौरभ, निखिल कुमार, अनंतबीर, नीरज, मोहित आणि विशाल अशी आरोपींची नावं आहेत. सर्व आरोपी हे उत्तर प्रदेशमधील राहणारे आहेत. सहारनपूर जिल्ह्यामधील देवबंद येथील गांधी कॉलनीमध्ये राहणारा सौरभ हा त्याच्या गावातील विशाल आणि नीरज या सख्ख्या भावांना ओळखत होता. ते देहराडूनला राहायचे. नीरज पाचवी नापास होता. तर विशाल हा आठवीत नापास झालेला होता. मात्र दोघेही डोक्याने चालाख होते. त्यांची गाठ पाडून घेण्यासाठी सौरभ हासुद्धा देहराडूनला आला होता. दोन्ही भावांची लाईफस्टाईल पाहून तो खूप प्रभावित झाला होता. खरंतर हे दोघेही भाऊ बनावट नोटांच्या धंद्यात गुंतलेले होते.
दरम्यान, हरिद्वारचे एसएसपी प्रमेंद डोभाल यांनी सांगितले की, विशालने सौरभ ची ओळख सहारनपूर येथील सरसावा येथील रहिवासी असलेल्या मोहित याच्यासोबत करून दिली. मोहित हा १२वी पास झालेला होता. तोसुद्धा देहराडूनमधील सुद्धोवाला येथे भाड्याच्या घरात राहत होता. तिथून तो बनावट नोटांचा धंदा चालवत होता. या धंद्यात होणारा लाभ पाहून सौरभसुद्धा त्यांच्या टोळीत घुसला. मोहितनंतर सौरभची ओळख सरसावा येथील निखिल कुमार याच्याशी झाली. दरम्यान, एका चांगल्या कंपनीत गार्डची नोकरी करून मिळणाऱ्या पगारातून शौक भागत नसल्याने निखिलने ५०० रुपयांच्या बनावट नोटा छापून श्रीमंत होण्याचा शॉर्टकड मार्ग अवलंबला. तसेच संपूर्ण प्रकरणाचा मास्टर माईंड बनला, अशी माहिती पोलिसांनी दिली.
बनावट नोटांप्रकरणी निखिल आणि मोहित यांना हिमाचल प्रदेश पोलिसांनी २०२१ मध्ये अटक केली होती. एसएसपी प्रमेंद डोभाल यांनी पुढे सांगितले की, सौरभ, निखिल आणि अनंतवीर हे बाजारात नकली नोटा चालवायचे. ते गर्दीच्या ठिकाणी असलेल्या दुकानांमध्ये तसेच वृद्ध दुकानदारांच्या दुकानामधून नोटा चालवण्याचं राम करायचे. दरम्यान, हे लोक देहराडून येथून हरिद्वार येथे येत असल्याची माहिती मिळाल्यानंतर पोलिसांनी त्यांच्या मुसक्या आवळल्या. त्यांच्याकडे करण्यात आलेल्या चौकशीमधून सव्वा दोन लाख रुपयांच्या बनावट नोटा, प्रिंटर, लॅपटॉप, आयफोन यासह नकली नोटा बनवण्याशी संबंधित इतर सामान जप्त करण्यात आलं आहे.