डेहराडून : उत्तराखंडमधील उत्तरकाशी येथील बोगद्यात १० दिवसांपासून अडकलेल्या ४१ मजुरांसाठी रात्रंदिन बचावकार्य सुरू आहे. त्यांना सुखरूप बाहेर काढण्यासाठी तीन वेगवेगळ्या योजनांवर काम सुरू आहे. सहा इंची नवीन पाइपलाइनमुळे मजुरांपर्यंत अन्न पोहाेचवण्यापासून ते त्यांच्याशी संवाद शक्य झाला आहे. असे असले तरी त्यांच्या सुटकेसाठी २, १५ किंवा ३५ दिवसांपर्यंत वेळ लागू शकतो, असे अधिकाऱ्यांनी स्पष्ट केले.
या संदर्भात राष्ट्रीय आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरणाचे सदस्य लेफ्टनंट जनरल सय्यद अता हसनैन आणि केंद्रीय रस्ते आणि वाहतूक मंत्रालयाचे सचिव अनुराग जैन यांनी माध्यमांशी मंगळवारी संवाद साधला.
सर्वांना वाचवण्याला सर्वोच्च प्राधान्य : मोदीपंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी सलग दुसऱ्या दिवशी मंगळवारी उत्तराखंडचे मुख्यमंत्री पुष्कर सिंह धामी यांच्याशी बोलून बोगद्यात अडकलेल्या मजुरांना सोडवण्यासाठी सुरू असलेल्या बचावकार्याचा आढावा घेतला, असे एक्सवरील एका पोस्टमध्ये मुख्यमंत्री धामी म्हणाले. १२ नोव्हेंबर रोजी बोगदा कोसळल्यापासून बचाव कार्याचा आढावा घेण्यासाठी मोदींनी धामी यांच्याशी चौथ्यांदा संवाद साधला. ‘पंतप्रधानांना एंडोस्कोपिक कॅमेऱ्याद्वारे कामगारांशी झालेल्या संभाषणाची माहिती देण्यात आली.
या दुर्घटनेनंतर हिमाचलने घेतला धडा nहिमाचल प्रदेशातील बांधकामाधीन बोगद्यांमध्ये आता सहा इंच जाडीचे पाईप बसविले जाणार आहेत. उत्तराखंडसारखी स्थिती उद्भवल्यास आत ऑक्सिजन आणि खाद्यपदार्थांचा पुरवठा करता यावा यासाठी ही व्यवस्था करण्यात येणार आहे. nठेकेदार कंपन्यांना बोगद्यात दोन अतिरिक्त पाईप्सची व्यवस्था करावी लागेल, जेणेकरून त्यांचा वापर आपत्कालीन परिस्थितीत ऑक्सिजन आणि अन्नपदार्थ पोहोचवण्यासाठी करता येईल.
ओगर मशीनने ड्रिलिंग सुरूओगर मशीनने पुन्हा ड्रिलिंग सुरू केले आहे. बोगद्यात पुरेसे पाणी, ऑक्सिजन, प्रकाश आहे. आकस्मिक परिस्थितीला सामोरे जाण्यासाठी दोन एनडीआरएफ पथके घटनास्थळावर सराव करीत आहेत.
दूरचित्रवाणी वाहिन्यांना सल्लाकेंद्रीय माहिती आणि प्रसारण मंत्रालयाने दूरचित्रवाणी वाहिन्यांसाठी एक सूचना जारी केली असून त्यांना सिल्क्यरा येथे बचाव कार्याचे सनसनाटी वृत्तांकन न करण्याचा आणि संवेदनशीलतेने वृत्तांकनाचा सल्ला देण्यात आला आहे.