लोकमत न्यूज नेटवर्कडेहराडून : तब्बल १० दिवसांपासून जगाशी संपर्क तुटलेल्या, अंधाऱ्या बोगद्यात भविष्याची चिंता करीत नातेवाइकांचे शब्द ऐकण्यासाठी कानात प्राण एकवटलेल्या ४१ मजुरांना मंगळवारी एक आशेचा किरण दिसला. नव्याने टाकण्यात आलेल्या ६ इंची पाइपलाइनद्वारे कॅमेरा आत टाकून त्यांच्याशी संवाद साधण्यात यश आले. त्यात मग एका मजुराने ‘मी ठीक आहे आई, कृपया तू वेळेवर जेवण घे,’ असा भावनिक संदेश दिला, तेव्हा सर्वांचेच डोळे पाणावले.
उत्तरकाशीमध्ये बोगद्यात अडकलेल्या कामगारांना सुखरूप बाहेर काढण्यासाठी १० दिवसांपासून बचावकार्य सुरू आहे. त्यात मंगळवारी बचाव पथकाला मोठे यश मिळाले. बोगद्यात अडकलेल्या कामगारांना एन्डोस्कोपिक फ्लेक्सी कॅमेऱ्याद्वारे पहिल्यांदाच पाहण्यात आले. बोगद्यातील अडकलेल्या कामगारांशी संवाद साधण्यासाठी वापरलेला एन्डोस्कोपिक फ्लेक्सी कॅमेरा बेळगावहून पाठविण्यात आला. एल ॲण्ड टीने बेळगावच्या पाणी योजनेच्या देखभालीसाठी हा कॅमेरा आणला होता.
बोगद्यातून नेमका काय संवाद झाला?बोगद्यात अडकलेला जयदेव म्हणाला, ‘माँ, टेंशन करोनी, आमी ठीक आची. टाइम ए खेये नेबे. बाबाके ओ टाइम ए खेबे निते बोलबे.’ (‘आई, माझी काळजी करू नकोस, मी ठीक आहे, प्लीज तू आणि बाबा जेवण वेळेवर कर’).
खिचडी, फळांचा केला पुरवठाnसहा इंची पाइपलाइन टाकल्याने अधिक सकस पदार्थ जसे, दलिया, खिचडी, सफरचंद, केळी अशी फळे पाठवली जात आहेत.