अखेरच्या क्षणी अडचणी : बोगद्यातील कामगार आशा-निराशेच्या हिंदोळ्यावर!
By ऑनलाइन लोकमत | Published: November 24, 2023 08:57 AM2023-11-24T08:57:15+5:302023-11-24T08:57:51+5:30
सहा तासांच्या विलंबानंतर दुपारी सुरू झालेले ड्रिलिंग सायंकाळी ठप्प
लोकमत न्यूज नेटवर्क
नवी दिल्ली/उत्तरकाशी : सिल्कियारा बोगद्यात ११ दिवसांपासून अडकलेल्या ४१ कामगारांचा प्रत्येक क्षण आशा-निराशेच्या हिंदोळ्यावर आहे. आता सुटका होईल, मग होईल, अशा आशेवर असलेल्या मजुरांना अजूनही वाट पाहावी लागण्याची शक्यता आहे. अडथळ्यांमुळे बुधवारी रात्री अनेक तास वाया गेल्यानंतर गुरुवारी दुपारी ड्रिलिंग पुन्हा सुरू झाले; परंतु, काही तासांतच पुन्हा अडचण निर्माण झाल्याने सायंकाळनंतर काम थांबले.
बोगद्याच्या ढिगाऱ्यातून ऑगर मशीन ड्रिल करताना पुन्हा अडचणी येत असल्याचे आंतरराष्ट्रीय बोगदातज्ज्ञ अरनॉल्ड डिक्स यांनी सांगितले. त्यांनी अडचणीचे स्वरूप स्पष्ट केले नाही. त्यामुळे मजुरांच्या सुटकेला आणखी विलंब होणार आहे.
नेमका अडथळा काय आला?
पाइपच्या समोर एक धातूची वस्तू (लॅटिस गर्डर रिब) आल्याने ड्रिलिंग ठप्प झाले होते. गॅस कटरचा वापर करून ती धातूची वस्तू कापण्याचे काम दुपारी अडीच वाजता पूर्ण झाले. आतापर्यंत एकूण ४८ मीटरपर्यंत पोहोचल्याचे एका अधिकाऱ्याने सांगितले.
आम्ही दरवाजापर्यंत पोहोचलो आहोत...
अडकलेल्या कामगारांना सहा इंचाच्या रुंद पाइपद्वारे अन्न, औषधी आणि इतर जीवनावश्यक वस्तू पुरवल्या जात आहेत. त्यातून त्यांच्याशी सातत्याने संपर्क ठेवला जात आहे. आम्ही दरवाजापर्यंत पोहोचलो आहोत आणि तो ठोठावत आहोत. आम्हाला माहीत आहे की, लोक दरवाजाच्या पलीकडे आहेत, असे आंतरराष्ट्रीय बोगदातज्ज्ञ अरनॉल्ड डिक्स म्हणाले.