हरिद्वार : देशभरात लोकसभा निवडणुकीची रणधुमाळी सुरु आहे. सर्वच राजकीय पक्ष प्रचारात व्यस्त आहेत. दरम्यान, उत्तराखंडमधील ऋषिकेश येथे एका विशाल जनसभेला संबोधित करताना पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी मागील काँग्रेस सरकारवर जोरदार हल्लाबोल केला. जेव्हा-जेव्हा देशात कमकुवत सरकार आले, तेव्हा देशात दहशतवाद पसरला. आज देशात मजबूत सरकार आहे, त्यामुळे आता दहशतवाद्यांना घरात घुसून मारलं जातं, असे नरेंद्र मोदी म्हणाले.
जम्मू-काश्मीरमध्ये सात दशकांपासून लागू असलेले कलम 370 हटवण्यात आले, हे मजबूत सरकारमुळे होऊ शकले, असेही नरेंद्र मोदी यांनी स्पष्टपणे सांगितले. आज देशात एक स्थिर सरकार आहे. जनतेने या सरकारचे काम बघितले आहे. मजबूत सरकारमुळे दहशतवाद संपुष्टात आला आहे, असे नरेंद्र मोदी म्हणाले. काँग्रेसचे सरकार कधीच 'वन रँक-वन पेन्शन' लागू करू शकलं नाही. मात्र आमच्या सरकारने ते लागू केले. 'वन रँक-वन पेन्शन' सैनिकांचा सन्मान आहे, असे नरेंद्र मोदी यांनी सांगितले.
काँग्रेसच्या सरकारमध्ये जवानांच्या सुरक्षेसाठी उपकरणे नव्हती. याआधी बुलेटप्रुफ जॅकेटचीही कमतरता होती. आज आधुनिक उपकरणे आहेत. काँग्रेसचे कमकुवत सरकार सीमांवर आधुनिक सोयीसुविधा देऊ शकले नाही. आज पाहिले तर सीमेवर आधुनिक रस्ते तयार होत आहेत. आधुनिक भूयार तयार होत आहेत. हे दशक उत्तराखंडचे असल्याचे काही दिवसांपूर्वी बाबा केदारनाथांचे दर्शन घेताना बोललो होतो, असेही नरेंद्र मोदी म्हणाले.
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी काँग्रेसचे माजी अध्यक्ष राहुल गांधी यांच्यावरही नाव न घेता जोरदार हल्लाबोल केला. ते म्हणाले की, आता काँग्रेसने हिंदू धर्मात असलेली शक्ती नष्ट करणार असल्याची प्रतिज्ञा घेतली आहे. इतकंच नाही तर काँग्रेसने माता गंगेला कालवा म्हटले आहे. उत्तराखंडची आस्था नष्ट करण्याचे षडयंत्र चालवण्यात येत आहे. त्यामध्ये काँग्रेसची काही विधाने आगीत तेल ओतण्यासारखी आहेत.
विकास आणि वारसा या दोन्ही गोष्टींना काँग्रेसचा विरोधविकास आणि वारसा या दोन्ही गोष्टींना काँग्रेसचा विरोध असल्याचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी सांगितले. तसेच, काँग्रेसने प्रभू रामाच्या अस्तित्वावर प्रश्न उपस्थित केला. राम मंदिराला विरोध केला. राम मंदिर होऊ नये म्हणून त्यांनी शक्य तितके अडथळे आणले. यानंतरही राम मंदिर बांधणाऱ्यांनी काँग्रेसचे सर्व गुन्हे माफ करून त्यांना अभिषेकासाठी बोलावले. पण त्यावरही काँग्रेसने बहिष्कार टाकला, असे नरेंद्र मोदी म्हणाले.