नमो नमो जी शंकरा! PM मोदींनी घेतलं 'आदि कैलासा'चं दर्शन,उत्तराखंडमधूनही स्पष्ट दिसतो पर्वत

By ऑनलाइन लोकमत | Published: October 12, 2023 12:35 PM2023-10-12T12:35:11+5:302023-10-12T12:39:47+5:30

नरेंद्र मोदींनी पार्वती कुंडाचे देखील दर्शन घेतले. येथून २० किलोमीटर अंतरावर चीनची सीमा सुरू होते.

PM Narendra Modi took darshan of Adi Kailash Parvat; the mountain is clearly visible even from Uttarakhand | नमो नमो जी शंकरा! PM मोदींनी घेतलं 'आदि कैलासा'चं दर्शन,उत्तराखंडमधूनही स्पष्ट दिसतो पर्वत

नमो नमो जी शंकरा! PM मोदींनी घेतलं 'आदि कैलासा'चं दर्शन,उत्तराखंडमधूनही स्पष्ट दिसतो पर्वत

नवी दिल्ली: पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आज सकाळी उत्तराखंडमधील पिथौरागढ येथील कैलाश व्ह्यू पॉइंटवरून आदि कैलास पर्वताला भेट दिली. हा व्ह्यू पॉइंट जोलिंगकॉंग भागात आहे, जिथून कैलास पर्वत स्पष्टपणे दिसतो. त्यामुळे चीनच्या ताब्यात असलेल्या तिबेटमध्ये जाण्याची गरज भासणार नाही. यासोबतच नरेंद्र मोदींनी पार्वती कुंडाचे देखील दर्शन घेतले. येथून २० किलोमीटर अंतरावर चीनची सीमा सुरू होते. नरेंद्र मोदी हे देशाचे पहिले पंतप्रधान आहेत, ज्यांनी उत्तराखंडमधीलभारत-चीन सीमेवरील आदि कैलास पर्वताला भेट दिली.

मोदींनी याबाबत ट्विटकरुन सांगितले, उत्तराखंडमधील पिथौरागढच्या पवित्र पार्वती कुंडातील दर्शनाने मी भारावून गेलो आहे. येथून आदि कैलासाचे दर्शन घेतल्याने मनही प्रसन्न होते. तसेच निसर्गाच्या कुशीत वसलेल्या या अध्यात्म आणि संस्कृतीच्या ठिकाणाहून नरेंद्र मोदी यांनी देशातील सर्व कुटुंबीयांना आनंदी आयुष्याच्या शुभेच्छा दिल्या. 

कैलास दर्शनानंतर पंतप्रधान मोदी उत्तराखंडमधील धारचुलापासून ७० किमी अंतरावर आणि १४००० फूट उंचीवर असलेल्या गुंजी गावात पोहोचले. येथे त्यांनी स्थानिक लोकांची भेट घेतली. येत्या दोन वर्षात हे गाव एक मोठी धार्मिक नगरी शिवधाम म्हणून विकसित होणार आहे. धारचुलानंतर कैलास व्ह्यू पॉइंट, ओम पर्वत आणि आदि कैलासच्या दर्शनासाठी येणाऱ्या भाविकांसाठी हा सर्वात मोठा आणि महत्त्वाचा थांबा असेल. याठिकाणी मोठी प्रवासी निवासस्थाने आणि हॉटेल्स बांधण्यात येणार आहेत. भारतीय दूरसंचार कंपन्यांचे नेटवर्कही उपलब्ध होईल. गावात पर्यटकांना राहण्यासाठी घरे देखील उपलब्ध करण्यात येणार आहे. 

गुंजी हे व्यास खोऱ्यातील सुरक्षित जमिनीवर वसलेले आहे, जिथे भूस्खलनाचा किंवा पुराचा धोका नाही. सध्या येथे केवळ २० ते २५ कुटुंबे राहतात, ज्यांना आपला खर्च भागवता येत नाही. पिथौरागढच्या डीएम रीना जोशी यांच्या म्हणण्यानुसार, नाभिधंग, ओम पर्वत आणि कैलाश व्ह्यू पॉइंटचा मार्ग गुंजीच्या उजव्या बाजूने जातो, तर आदि कैलास आणि जॉलीकॉंगचा मार्ग डावीकडून जातो. त्यामुळे कैलास यात्रेकरूंच्या सोयीसाठी हे गाव योग्य आहे.

PM मोदी जागेश्वर धामलाही भेट देणार-

पंतप्रधान जागेश्वर, जिल्हा अल्मोडा येथे जातील. येथे ते जागेश्वर धामला भेट देतील. सुमारे ६२०० फूट उंचीवर असलेल्या जागेश्वर धाममध्ये २२४ दगडी मंदिरे आहेत. दुपारी पंतप्रधान ग्रामीण विकास, रस्ते, वीज, सिंचन, पिण्याचे पाणी, फलोत्पादन, शिक्षण, आरोग्य आणि आपत्ती व्यवस्थापन यासारख्या क्षेत्रांशी संबंधित पिथौरागढमध्ये सुमारे ४२०० कोटी रुपयांच्या विकास प्रकल्पांचे उद्घाटन करतील.

Web Title: PM Narendra Modi took darshan of Adi Kailash Parvat; the mountain is clearly visible even from Uttarakhand

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.